राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले हा सत्तेचा गैरवापर ! – शरद पवार, खासदार

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले, हा सत्तेचा गैरवापर आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्याविषयी काहीच होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा, यासाठी माझ्यासह मल्लीकार्जुन खर्गे, डी. राजा, तसेच तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

शरद पवार पुढे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी राज्याबाहेरही उमेदवार देणार आहे. लक्षद्वीप, अंदमानला आमचे उमेदवार असणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीत असलेल्या पक्षांनी एकत्रित काम करावे, असे मत आहे. राज्याच्या घटक पक्षांनीही एकत्र बसून सर्व विषयांवर चर्चा करावी. काही ठिकाणी ‘इंडिया’ आघाडीमध्ये वाद-विवाद आहेत. उत्तर प्रदेश आणि बंगालमधे थोडे वाद आहेत. जागा वाटपाविषयी ‘इंडिया’ आघाडीमध्ये चर्चा चालू आहे.’’