|
नाशिक – जिल्ह्यातील येवला शहरातील विंचूर चौफुलीवरील सर्व्हे क्रमांक ३ सहस्र ८०७, ३ सहस्र ८०८ आणि ३ सहस्र ९०७ वरील अतिक्रमित गाळे वर्ष २००९ आणि २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरपालिकेने पाडले होते. नगरपालिकेने ठेकेदारांच्या माध्यमातून नव्याने व्यापारी संकुल बांधले. संकुल पूर्ण होऊनही लिलाव होत नसल्याने १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात शिवप्रेमींनी सर्व्हे क्रमांक ३ सहस्र ८०८ वरील व्यापारी संकुलाला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल’ असा नामकरणाचा फलक लावला. नगरपालिकेचे कर्मचारी व्यापारी संकुलावर लावलेला फलक काढावयास आले. या वेळी शिवप्रेमींनी नगरपालिकेच्या कर्मचार्यांना फलक काढण्यास विरोध केला आणि ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. शिवप्रेमींचा विरोध पाहून नगरपालिका कर्मचार्यांनी पलायन केले.
व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन २ वर्षे झाली. (२ वर्षे होऊनही लिलाव न होणे प्रशासनाला लज्जास्पद !- संपादक) महापालिका प्रशासनाला युवकांनी ‘व्यापारी संकुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल हेच नाव द्यावे’, अशा आशयाचे निवेदन देत गाळ्यांचे लिलाव करण्याची मागणी केली. या वेळी युवा नेते शाहूराजे शिंदे यांच्यासह अन्य शिवप्रेमी युवक, नागरिक उपस्थित होते.