देहली सेवाकेंद्रातील साधिका कु. कृतिका खत्री यांचा माघ शुक्ल द्वादशी (२१.२.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. कृतिका खत्री यांना ३४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ! |
१. सौ. क्षिप्रा जुवेकर (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव सेवाकेंद्र
१ अ. त्रासांवर मात करून सेवा करणे
१. ‘अधिवेशनाच्या वेळी कृतिकाताईला चर्चासत्र घेण्याची सेवा होती. त्या वेळी शारीरिक त्रास होत असल्याने तिचा आवाज बसला होता, तरीसुद्धा ताईने प्रार्थना करून, गरम पाणी पिऊन त्यावर मात करत विषय घेतला. शेवटपर्यंत ताईने प्रयत्न सोडले नाहीत आणि विषयाची मांडणी चांगल्या प्रकारे केली.
२. एकदा कार्यशाळेत एका विषयाची मांडणी करायची होती. त्या वेळी आध्यात्मिक त्रास होत असूनही त्यावर मात करून ताईने विषय सांगितला.
३. एकदा तीव्र त्रास होत असल्याने कृतिकाताईला अंथरुणातून उठता येत नव्हते. केवळ ‘प्रसारसेवेसाठी बाहेर जायचे आहे’, असे तिला एकदा सांगितल्यावर ती त्वरित सेवेसाठी सिद्ध झाली. तिच्यात सेवेची पुष्कळ तळमळ आहे. कितीही शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असले, तरीही त्यावर मात करून ती सेवा करण्याचा प्रयत्न करते.
१ आ. कृतिकाताई उच्च शिक्षित असली, तरीही तिने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला आणि अल्प वयातच तिने स्वतःला गुरुदेवांच्या श्रीचरणी अर्पण केले आहे.
१ इ. निरागस भाव : कृतिकाताईमध्ये निरागस भाव आहे. तिच्या मनात कुणाबद्दलही पूर्वग्रह किंवा प्रतिक्रिया येत नाहीत. एखाद्याबद्दल काही विचार तिच्या मनात आले, तर त्या संदर्भात ती संबंधित साधकाशी बोलून घेते.
१ ई. नेतृत्व : ताईमध्ये नेतृत्व गुण पुष्कळ चांगला आहे. सेवेसाठी कोणावरही अवलंबून न रहाता स्वतःच सेवा करणे, इतरांना बरोबर घेऊन सेवा करणे आणि सर्वांना सेवेत सहभागी करून घेणे, हे गुण तिच्यात आहेत.’
२. कु. पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. संघटनकौशल्य : ‘संघटनकौशल्य हा ताईमधील पुष्कळ चांगला गुण आहे. समाजातील जिज्ञासूंना भेटणे, त्यांना एकत्रित करणे, या सेवा ती चांगल्या प्रकारे करते.
२ आ. सेवेची तळमळ : बर्याचदा ताईला सेवेसाठी बाहेर जावे लागते आणि परत येण्यास उशीर होतो. परत आल्यावर जर काही ऑनलाईन चर्चासत्र असेल किंवा चित्रीकरण असेल, तर त्यातसुद्धा ताई उत्साहाने सहभागी होते आणि सेवा परिपूर्ण करते.
२ इ. पुढाकार घेणे : गुरुकार्यासाठी ‘समाजातील जिज्ञासू व्यक्तींकडून अर्पण गोळा करणे, ईश्वरी कार्यात त्यांना सहभागी करून घेणे’, अशा सेवा ताई उत्साहाने करते. देहलीमध्ये होणार्या विश्व पुस्तक मेळाव्याच्या वेळी जिज्ञासूंना त्यात सहभागी करून घेणे, भोजन किंवा आवश्यक वस्तूंच्या संदर्भात प्रायोजक मिळवण्याची सेवा ताईने पुढाकार घेऊन उत्साहाने केल्या.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने, गुरुदेवांच्या गुणांशी एकरूप झालेल्या साधकांच्या समवेत रहाण्याची संधी मिळते. त्याबद्दल गुरुदेवांच्या पावन चरणी मी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते. ‘सर्व साधकांत असलेल्या गुणांमधून शिकून आपल्याला अपेक्षित अशी सेवा आणि साधना आम्हाला करता यावी’, अशी आपल्या परम दिव्य श्री चरणी मी प्रार्थना करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २.२.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात |