नवी मुंबई, १८ फेब्रुवारी (वार्ता.)- हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघरमध्ये ‘अश्वमेघ महायज्ञ’ होणार आहे. या महायज्ञात देश-विदेशातून लाखो भाविक सहभागी होणार आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या महायज्ञ स्थळाची पहाणी केली. या वेळी महायज्ञ समितीचे प्रमुख शरद पारधी, परमानंद द्विवेदी, वीरेंद्र तिवारी, गौरीशंकर सैनी, पोलीस उपायुक्त संजय येनपुरे, विवेक पानसरे आदी उपस्थित होते. या वेळी पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी यांना महायज्ञ समितीच्या वतीने गायत्री मंत्र लिहिलेली वस्त्रे भेट देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी आयुक्तांनी महायज्ञातील सुरक्षा व्यवस्था, वाहतूक, यज्ञस्थळ, प्रदर्शन, स्वयंसेवकांची निवासस्थाने आदींची माहिती घेतली. यज्ञात सहभागी होणार्या भाविकांची हालचाल आणि भाविकांच्या संख्येनुसार निवास आदी व्यवस्था त्यांनी जाणून घेतली. १००८ कुंडीय यज्ञशाळेची पहाणी करून ‘महायज्ञ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू’, असे आश्वासन दिले.
अश्वमेध महायज्ञ समितीने सांगितले की,
१. महायज्ञस्थळी ४ टप्प्यांत सुरक्षा व्यवस्था असणार आहे. यामध्ये स्थानिक पोलिसांसह शांतीकुंजचे सुरक्षारक्षक, स्वयंसेवक असतील. संपूर्ण यज्ञस्थळावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी ४०० ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत.
२. स्थानिक पोलिसांसह यज्ञ समितीच्या सुरक्षा विभागाकडून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
३. महायज्ञात अनेक मोठ्या व्यक्ती विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.