पिंपरी येथील ‘क्रिएटिव्ह अकादमी’चे अनधिकृत बांधकाम पाडणार !

पिंपरी – रावेत येथील ‘क्रिएटिव्ह अकादमी’चे अनधिकृत बांधकाम महापालिका पाडणार असून अकादमीच्या इमारत मालकाला महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने नोटीस दिली आहे. ‘क्रिएटिव्ह अकादमी’च्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी शेख याच्यावर पोक्सो आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद करून त्याला कह्यात घेतले. यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पहाणीत मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले असून तेथे पत्र्याची शेड आणि साठवणुकीची खोली (स्टोअर रूम) केली आहे. संबंधित वाढीव बांधकाम ३० दिवसांच्या आत काढावे, अन्यथा महापालिका कारवाई करेल, तसेच कारवाईसाठी येणारा खर्चही वसूल करण्यात येईल, असे नोटिसीमध्ये नमूद केले आहे. नोटिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पाडण्यात येईल, असे ‘ब’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

इतके दिवस अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ?