अन्य एकाने देहली उच्च न्यायालय उडवण्याची दिली धमकी !
नवी देहली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि देहली उच्च न्यायालय यांना बाँबने उडवण्याच्या दोन स्वतंत्र धमक्या देण्यात आल्या आहेत. बिहारचे पोलीस महासंचालक आर्.एस्. भाटी यांना एकाने ऑडिओ क्लिप पाठवली होती. त्यात म्हटले होते की, ‘नितीश यांना सांगा की, भाजपसमवेत जाऊ नका, अन्यथा आम्ही त्यांना बाँबने उडवू आणि त्यांच्या आमदारांनाही मारून टाकू.’ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून सोनू पासवान नावाच्या व्यक्तीला कर्नाटकच्या दावणगेरे येथून अटक केली आहे. पासवान हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्याचा रहिवासी असून तो कर्नाटकात बोर्या शिवण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पासवान म्हणाला की, वारंवार होणार्या बिहार राज्यातील सत्तापालटांमुळे तेथील विकास प्रभावित होत असून गरिबी आणि बेरोजगारी वाढत होती. त्यामुळे वैतागून मी अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याचा भ्रमणभाष जप्त केला आहे.
दुसर्या घटनेत १४ फेब्रुवारीच्या सायंकाळी उशिरा देहली उच्च न्यायालयाच्या एका अधिकार्याला एक ई-मेल प्राप्त झाला. १५ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात मोठा स्फोट करणार असल्याचे त्यात म्हटले होते. ‘हा स्फोट देहलीतील सर्वांत मोठा स्फोट असेल. शक्य तितकी सुरक्षा तैनात करा आणि सर्व मंत्र्यांना बोलवा. आम्ही तुम्हाला सगळे मिळून उडवून देऊ’ अशी धमकीही त्यात देण्यात आली होती.
यानंतर न्यायालयाच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली. आवारात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. धमकी देणार्याची ओळख पटवली जात आहे.