प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा हार घालून सन्मान करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीराममंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. हिंदु जनजागृती समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

व्यासपिठावर उपस्थित डावीकडून श्री. भरत गोगावले, श्री. रणजित सावरकर, श्री. सुरेश चव्हाणके, प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज, श्री. एकनाथ शिंदे, डॉ. नीलम गोर्‍हे, श्री. दीपक केसरकर, श्री. रमेश शिंदे

१४ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प.पू. स्वामीजींच्या ओघवत्या वाणीतील मार्गदर्शनाने उपस्थित राष्ट्र आणि धर्माभिमानी एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन बाहेर पडले ! या वेळी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कोलू ओढतांनाची प्रतिकृती आणि मानपत्र प्रदान करण्यात आले.

छत्रपती शिवराय, संत ज्ञानेश्वर यांचा आदर्श घेतला, तर महाराष्ट्र जगाचे नेतृत्व करेल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

भगूर येथे स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यासाठी स्थान मिळण्यात अडचणी होत्या, तेव्हा  ‘जगाला गवसणी घालणारा थोर पुरुष येथे जन्माला आला, त्याला इथे योग्य स्थान दिले नाही, तर पुढच्या पिढ्या तोंडात शेण घालतील’, असे सांगितले. नंतर प्रश्न सुटला. माझ्या विचारांची गंगा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद या दोन तटांमधून वहात गेली म्हणून ती श्रीराममंदिरापर्यंत पोचू शकली. छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर यांची विचारधारा देशाला तारणारी आहे. त्याचे पूजन करण्याचा प्रयत्न आजीवन केला. बालसंस्कार करणे म्हणजे पुढच्या पिढीमध्ये छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे संस्कार करणे. अनेक पिढ्यांनंतर श्रीराममंदिर उभे राहिले. आता मात्र याच पिढीत आपले राष्ट्र उभे रहात असतांना आपण अनुभवूया. त्याकरता जे साहस लागते, ते करणारे मुख्यमंत्री भेटले. व्यक्तीनिष्ठेपेक्षा तत्त्वनिष्ठा महत्त्वाची असते. विचारांना पुढे नेण्यातच सार्थक आहे. याकरिता छत्रपती शिवाजी महाराज मनात ठेवून जगावे लागते. मी जगाच्या वाङ्मयाचा मागोवा घेतला; पण जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्यासारखी रत्ने  नाहीत. महाराष्ट्र यांचा आदर्श घेऊन चालेल, तर महाराष्ट्र पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व करेल ! आपले राष्ट्र धर्मासाठी आहे आणि मी धर्मासाठी आहे. परमेश्वराने त्यासाठी मला बळ द्यावे.


प.पू. स्वामीजींचे तपस्वी जीवन रखरखत्या उन्हात वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रत्येकजण धकाधकीच्या जीवनात व्यस्त असतो. स्पर्धेचे युग चालू आहे. अशा काळात संत-महंतांच्या सहवासामुळे वेगळी ऊर्जा, अनुभूती आणि प्रेरणा मिळते. यामुळेच आम्हाला सेवा करायला बळ मिळते. अशा ठिकाणी भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य यांचा दरवळ आहे. या ठिकाणी कुणाचा स्वार्थ नाही. प.पू. स्वामीजींसारख्या तपस्वींनी धर्मासाठी केलेले कार्य हे रखरखत्या उन्हात वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे आहे. या स्पर्धेच्या युगात संतांच्या मार्गदर्शनाचा सर्वांना आधार वाटतो. संतांच्या मार्गदर्शनामुळे सर्वसामान्य व्यक्तींना भवसागरातून बाहेर पडायला साहाय्य हाेते. कार्य करतांना मला काय मिळाले, यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो, असा भाव मनात ठेवायला हवा. संतांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही जनतेची सेवा करू शकतो. स्वामीजींचे अखंडित कार्य आणि मार्गदर्शन यांमुळे समाजाला लाभ होत आहे. प.पू. स्वामीजींनी ७५ वर्षे अखंड यज्ञकुंड पेटवला आहे. स्वत:साठी सर्व जगतात; परंतु स्वामीजींसारखी व्यक्तीमत्त्वे देशासाठी कार्य करतात, हे आपले भाग्य आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीचे रक्षण व्हायला हवे. आपण आपले सण-परंपरा जपण्याची आवश्यकता आहे. मंदिरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड-दुर्ग यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे हे कार्य चालू आहे.


श्री. रमेश शिंदे

स्वामी हे राष्ट्रयोगी संत आहेत. धर्म आणि अध्यात्म यांसह राष्ट्रविषयक महत्त्वाचे विचारधन स्वामीजी देत आहेत. हिंदुत्वाच्या कार्यामध्ये अडचणी येतात, ‘धर्मकार्य करतांना पुढे कसे जायचे ?’ याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी स्वामी मार्गदर्शक ठरतात. भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी स्वामीजी पितृतुल्य स्थानी आहेत. समस्त हिंदुत्वनिष्ठ सहजपणे त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेतात आणि त्यातून पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा सांगण्याचे महत्कार्य स्वामीजींकडून चालू आहे. प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही आपली परंपरा आहे. राममंदिराच्या उभारणीच्या वेळी आलेल्या अनेक समस्या स्वामीजींनी लीलया पेलल्या. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वत: भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुन धर्मयुद्धासाठी प्रेरित झाला, म्हणजे या मार्गदर्शनानंतर अर्जुन कर्तव्यपूर्ततेसाठी सिद्ध झाला. त्याप्रमाणे स्वामीजींच्या मार्गदर्शनाने हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी, धर्मसंस्थापनेसाठी आणि मंदिरांच्या रक्षणासाठी कार्यरत व्हावे. आदर्श राज्य किंवा हिंदु राष्ट्र बनण्यासाठी त्यांनी आशीर्वाद द्यावेत.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

राममंदिराच्या संदर्भात अनेक चर्चा झाल्या. स्वामीजींच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य हे सर्वांत मोठे उत्तर होते. आदर्श राज्य, म्हणजे हिंदु राष्ट्र बनण्यासाठी आशीर्वाद द्यावेत.  रामराज्याला आपण आदर्श मानतो. रामराज्य आदर्श होते; कारण प्रभु श्रीराम आदर्श होतेच; परंतु रामराज्यातील प्रधान, सेनापती आणि कोषाध्यक्ष हेही आदर्श होते. अशा आदर्श राज्याच्या म्हणजे रामलल्लासाठी कोषाध्यक्षही आदर्श मिळाले आहेत, अशा शब्दांत श्री. रमेश शिंदे यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा गौरव केला.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुरेश चव्हाणके

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. ४० वर्षांपूर्वी एका शिबिरात गटनायक म्हणून त्यांची आणि माझी ओळख झाली होती. तेव्हा त्यांची जी तेजस्वी वाणी होती, तीच वाणी, तेच ंिहंदुत्व आजही पहायला मिळत आहे. आता त्यांचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत. त्यांच्या रोमारोमात हिंदुत्व भिनलेले आहे. आळंदी येथे ७५ संतांचा सन्मान करून प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्याद्वारे प.पू. स्वामीजींनी ‘अमृत महोत्सव कसा साजरा केला जाऊ शकतो ?’, याची शिकवण समाजाला देण्यासाठी स्वतःचा अमृत महोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली’, असे मला वाटते. ‘आजप्रमाणे त्यांची भव्य शताब्दीही साजरी करण्याचे सौभाग्य मिळावे’, अशी मी इच्छा व्यक्त करतो. अध्यात्माच्या दृष्टीकोनातून आळंदीचे जे महत्त्व होते, तेच हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे आहे. ‘हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत’, असे मी आवाहन करतो.

– श्री. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन’ न्यूज