मुंबई – भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ घंट्यांनंतर अशोक चव्हाण, पुण्याच्या प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
कोथरूडमधून तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक लढल्याने प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांना तेथील उमेदवारी देण्यात आली नव्हती. ‘अशोक चव्हाण यांना राज्यसभेचे आश्वासन दिले गेले असावे’, अशी चर्चा आहे.
अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत आणि त्यांना पक्षसंघटनाचा अनुभव आहे. मराठा-ब्राह्मण आणि लिंगायत अशा समाजाचे समीकरणही यातून भाजपने साधले आहे, असे म्हटले जात आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना अद्याप कुठलीही उमेदवारी देण्यात आलेली नाही.