पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेच्या ‘आकाश चिन्ह’ आणि ‘परवाना विभागा’ने शहरातील १ सहस्र १०० विज्ञापनफलक (होर्डिंग) धारकांना थकीत शुल्क भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. थकीत शुल्काची रक्कम २९ फेब्रुवारी या दिवसापर्यंत भरावी, अन्यथा विज्ञापनफलक विनाअनुमती लावला, असे गृहित धरून कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली आहे.
शहरांमध्ये महापालिकेच्या जागेत विज्ञापनफलक उभारले जातात, तसेच खासगी जागामालकांना विज्ञापनफलक उभारण्यास अनुमती दिली जाते. विनाअनुमती विज्ञापनफलक उभारून पालिकेचे उत्पन्न बुडवतात, तसेच परवाना घेतल्यानंतरही शुल्क भरले जात नाही. १७ एप्रिल २०१३ या दिवशी किवळेतील विज्ञापनफलक दुर्घटनेनंतर सर्वच विज्ञापनफलकांचे ‘स्ट्रक्चरल रिपोर्ट’ (वस्तूनिष्ठ अहवाल) घेण्यात येत होते. त्यादरम्यान परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील सर्वच विज्ञापनफलक धारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.