शाहबाझ शरीफ होऊ शकतात पाकचे नवे पंतप्रधान !

  • नवाझ शरीफ यांच्याकडून निवड

  • बिलावल भुट्टो झरदारी यांचा पक्ष देणार बाहेरून पाठिंबा

शाहबाझ शरीफ

इस्लामाबाद / लाहोर – पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवाझ शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ’ (पी.एम्.एल्.एन्.) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) या पक्षांतील आघाडी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. दोन्ही पक्षांचे नेते अडीच-अडीच वर्षांसाठी पंतप्रधानपदी रहातील, अशी चर्चा चालू होती; परंतु आता ‘पीपीपी’ने ही मागणी मागे घेऊन नवाझ शरीफ यांच्या पक्षाला बाहेरून समर्थन देण्याचे घोषित केले आहे.

दुसरीकडे ‘पी.एम्.एल्.एन्’ पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब म्हणाल्या की, नवाझ शरीफ यांनी त्यांचे धाकटे भाऊ शाहबाझ शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि मुलगी मरियम नवाझ यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली आहे.

पाकिस्तानला संकटातून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे ! – झरदारी

बिलावल भुट्टो झरदारी यासंदर्भात म्हणाले की, पंतप्रधानपदावरून आम्ही आमचा दावा मागे घेत आहोत. मला आणि माझ्या पक्षाला देशात कोणतीही नवीन समस्या पहायची नाही. आम्हालाही फेरनिवडणूक नको आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधानपद मागणार नाही आणि सरकारमध्येही सहभागी होणार नाही. असे असले, तरी संसदेचे अध्यक्ष आमच्या पक्षाचे असतील. पाकिस्तानला संकटातून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे, हे या निर्णयामागचे कारण आहे.