हिंजवडी येथे बनावट पारपत्र सिद्ध करणारे कह्यात !

देशाच्या सुरक्षेचे तीन तेरा !

पिंपरी (जिल्हा पुणे) – परदेशात जाण्यासाठी बनावट पारपत्र सिद्ध करणार्‍या तिघांसह बनावट शिक्का बनवून देणार्‍यालाही हिंजवडी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. आरोपींनी १२५ लोकांकडून मूळ पारपत्र घेऊन ४८ बनावट पारपत्रे बनवली. विजय सिंह, किसन पांडे (दोघेही रहाणार उत्तरप्रदेश) हेमंत पाटील, किरण राऊत अशी कह्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या संदर्भात मनीष कन्हैयालाल स्वामी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी आयात निर्यात व्यवसायात काम करत होते. भारतातून परदेशात जाणारे वेल्डर, वाहनचालक आणि प्लंबर यांना पारपत्र देण्यासाठी त्यांनी ‘ब्ल्यू एशियन मरीन’ या नावाने आस्थापन चालू केले होते. पारपत्र काढून देण्यासाठी लोकांकडून खरे पारपत्रही ते घेत होते. लोकांकडून पारपत्र काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पळून जायचे असा त्यांचा उद्योग होता. नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पारपत्रावर ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का मारून त्यांना ते खरे पारपत्र असल्याचे भासवले जात असे; मात्र विमानतळावर गेल्यावर लोकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झालेल्या काही लोकांनी देहली येथील ब्रूनेई देशाच्या दुतावासात जाऊन निश्चिती केली असता त्यांच्या पारपत्रावर बनावट शिक्के मारल्याची निश्चिती झाली.