१४ फेब्रुवारी या दिवशी होणार इस्लामी देश संयुक्त अरब अमिरातमधील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन !

पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन !

नवी देहली – संयुक्त अरब अमिरातमधील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन उद्या १४ फेब्रुवारी या दिवशी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अबू धाबीमध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे.

हे स्वामीनारायण मंदिर असून उद्घाटनानंतर येत्या १ मार्च पासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबू धाबीसाठी मार्गस्थ झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, या दौर्‍यात मी संयुक्त अरब अमिरात आणि आणि कतार या देशांना भेट देणार आहे. तेथील अनेक कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित रहाणार आहे. यामुळे द्वीपक्षीय संबंध वृद्धींगत होतील. मी पंतप्रधान झाल्यापासून  संयुक्त अरब अमिरातला भेट देण्याची ही ही माझी सातवी वेळ आहे.

या दौर्‍यात मी संयुक्त अरब अमिरातमधील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन करीन. अबू धाबीमधील कार्यक्रमात मी तेथील हिंदु समुदायाशी संवाद साधेन. त्यापुढे कतारमध्ये मी शेख तमिम बिन हमाद यांची भेट घेईन. त्यांच्या नेतृत्वाखाली कतार वेगाने विकास करत असल्याचे जगाने पाहिले आहे.