UK Indians Robbery Threat : लंडनमध्ये भारतियांच्या लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ !

  • आरोपींना पकडण्यास लंडन पोलीस अपयशी !

  • विरोधी पक्षाकडून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर टीका

लंडन (ब्रिटन) – लंडनमध्ये भारतियांवर आक्रमणे करून त्यांची लुटमार करण्याच्या घटनांत तिपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भारतियांना लुटल्याच्या २७० घटना घडल्या होत्या, तर वर्ष २०२२ मध्ये ही संख्या ९० होती. यांत आता मोठी वाढ झाली आहे. भारतियांकडून सोनसाखळ्या, पाकीट, घड्याळे आणि भ्रमणभाष संच हिसकावून घेण्याच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे लंडन पोलिसांना कोणत्याही घटनेतील आरोपींना अटक करण्यात किंवा मुद्देमाल जप्त करण्यात यश आलेले नाही.

लंडनमध्ये परदेशी नागरिकांच्या लुटमारीच्या घटना सर्वाधिक आहेत, तर स्थानिकांना लुटल्याच्या घटना त्या तुलनेत अल्प आहेत.

लंडनपेक्षा देहली अधिक सुरक्षित !  – इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स

या संदर्भात इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या लंडन शाखेने परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेऊन भारतियांच्या लुटमारीच्या घटनांचा निषेध केला. शिष्टमंडळाने सांगितले की, लंडनपेक्षा देहली अधिक सुरक्षित आहे. तेथे लुटमारीच्या इतक्या घटना घडत नाहीत.

“‘जेव्हा आम्ही पोलिसांत गुन्हा नोंदवायला जातो, तेव्हा पोलीस आम्हाला सल्ला देतात की, भारतियांनी मौल्यवान वस्तू घेऊन बाहेर पडू नये.’ – देवेन नारंग, लंडन”

  • ‘भारतियांना लंडन असुरक्षित वाटत आहे.’ – डेव्हिड लॅमी, नेते, मजूर पक्ष
  • ‘पंतप्रधान सुनक हे भारतियांच्या सुरक्षेसाठी पावले उचलत नाहीत.’ – सारा ओल्नी, खासदार