माझ्या नादाला लागू नका ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रामटेक (नागपूर) – काही लोक म्हणत आहेत की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावायची ? सरकार कोणताही गुन्हा करणार्‍याला पाठीशी घालणार नाही, तुमच्या काळात हनुमान चालिसा म्हटली म्हणून तुम्ही लोकांना कारागृहात डांबले, केंद्रीय मंत्र्याला जेवतांना भरल्या ताटावरून उठवून अटक केली. गृहमंत्र्याला त्यागपत्र द्यावा लागला, तरीही राष्ट्रपती राजवट लावली नाही, मग आता काय झाले ? माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात, तर मी कुणालाही सोडत नाही, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिली आहे. नागपूरच्या रामटेक येथे ‘शिवसंकल्प’ अभियानांतर्गत आयोजित सभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. शिवसंकल्प अभियानाचा पुढचा टप्पा ११ फेब्रुवारी या दिवशी या लोकसभा मतदारसंघात पार पडला.

‘दाढी खेचून आणली असती’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही दाढी इतकी हलकी आहे का ? या दाढीने जर काही काडी फिरवली, तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका.