घोसाळकर हत्याप्रकरणानंतर राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांना उधाण !

मुंबई – संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची गुन्हेगारांसमवेतची छायाचित्रे ‘एक्स’वर दिली जात आहेत. शिंदे गटाकडूनही त्याच गुन्हेगार व्यक्तीची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत असलेली छायाचित्रे प्रसारित करण्यात आली. घोसाळकर हत्याप्रकरणानंतर भाजप आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, तसेच मुख्यमंत्री, मंत्री दीपक केसरकर आदी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

१. ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि तात्काळ निवडणुका घ्या. सरकारवर नुसते ताशेरे ओढल्याचा उपयोग नसतो. कृपा करून जनतेला आणि लोकशाहीला वाचवा’, असे उबाठा गटाचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

२. ‘फडणवीस हे लोमडी आणि मनोरुग्ण आहेत. पूर्वी गुंड-टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध होत होते. आता सरकारमध्ये ते चालू आहे. गुंडांना मिळणारे सरकारचे संरक्षण हा चिंतेचा विषय आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

३. ‘राज्यात व्यक्तीगत वैमनस्यातून काही गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. मी त्यांचे गांभीर्य नाकारत नाही; पण त्या घटनेचा थेट राज्याच्या परिस्थितीशी संबंध जोडणे अयोग्य आहे. ठाकरे यांची भाषा आणि शब्द पहाता ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना लवकर बरे वाटावे’, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

४. उद्धव ठाकरे ‘करमचंद जासूस’ असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तर त्यावर प्रत्युत्तर देतांना संजय राऊत म्हणाले, ‘‘करमचंद जासूस यांना प्र्रतिष्ठा होती. गुंडाबरोबर बैठका घेऊन हे लक्षात येत नाही.’’

५. मॉरिस नोरोन्हा याने अभिषेकवर गोळ्या झाडल्या कि अन्य व्यक्तीने, दोघांना मारण्याची सुपारी कुणी दिली होती का ? माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत मॉरिसचे छायाचित्र कसे ? गुंड असलेला मॉरिस आत्महत्या का करेल ? घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण का दडवून ठेवण्यात आले ? असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी १० फेब्रुवारी या दिवशी उपस्थित केले होते.