पोलिसांनी ‘जनतेचे सेवक’ म्हणून कर्तव्य पार पाडावे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

नाशिक – पोलीसदलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी ‘शासक’ म्हणून नाही, तर ‘जनतेचे सेवक’ म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे ३४ व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते.

या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद आदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ताणतणावापासून दूर रहाण्यासाठी खेळ महत्त्वपूर्ण आहेत. खेळामुळे संघभावना निर्माण होऊन आव्हाने पेलण्याची स्फूर्ती आणि शक्ती मिळत असल्याने खेळाडू प्रत्येक क्षेत्रात त्याची चमक दाखवत असतो. महाराष्ट्र राज्याचे पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते आपले कर्तव्य निर्भीड आणि नि:स्पृहपणे पार पाडतात. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कल्याणासाठी चांगली दर्जेदार घरे उपलब्ध करून देणे, कुटुंबियांना आरोग्य, शिक्षण यांच्या योजना देण्यासाठी शासन सदैव कटीबद्ध आहे.’’