आळंदी (पुणे) येथे उत्साही, चैतन्यमय आणि भावपूर्ण वातावरणात प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’ची सांगता !
आळंदी (जिल्हा पुणे), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रात एकाच कुटुंबात ४ संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळत आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांनी घडवले होते. त्यांनी औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिले. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रम यांची भूमी आहे, कारण येथे संतांचे सान्निध्य आहे, असे गौरवोद्गार उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे काढले. ११ फेब्रुवारी या दिवशी येथील वारकरी शिक्षण संस्थेसमोर आयोजित करण्यात आलेल्या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, योगऋषि बाबा रामदेव, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, उमा खापरे आदी उपस्थित होते.
या वेळी योगी आदित्यनाथ यांचा जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती महाराज यांच्या मंगलहस्ते छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असत, त्याप्रमाणे जिरेटोप घालून सन्मान करण्यात आला. महोत्सवाच्या ८ व्या दिवसाचा प्रारंभ ‘आनंदोत्सवा’ने झाला. यात १५ सहस्रांहून अधिक भाविक सहभागी झाले होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘‘मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी सनातन धर्मासाठी काम करत आलो आहे. आज श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक करतो. अगदी लहान होतो, तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदी येथे येण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. आळंदी येथील पवित्र भूमीवर हा पवित्र कार्यक्रम पूर्ण भव्यतेने आणि दिव्यतेने आयोजित करण्यात आला आहे. स्वामीजींनी गेली ७५ वर्षे वैदिक सनातन धर्मासाठी चिकाटीने आणि समर्पित रूपाने प्रयत्न केले आहेत. हा महोत्सव प.पू. स्वामी श्री गोविंददेव गिरि महाराज यांनी हाती घेतलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे.’’
प्रत्येकाने ५ तपस्वी व्यक्तींचा सन्मान करून वाढदिवस साजरा करावा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘मी आळंदीच्या भूमीला सर्वांत पवित्र मानतो. माझे मन केवळ आळंदीतच रमते. येथे भागवत कथा ऐकायची आणि ज्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन धर्मासाठी व्यतीत केले, अशा ७५ त्यागी तपस्वींना बोलावून त्यांचा सन्मान करायचा. त्यांच्या मुखांवरील आनंद मला अनुभवायचा होता; पण हळूहळू कार्यक्रम वाढत गेला. मला असे वाटते की, आपणही आपला वाढदिवस किमान ५ अशा तपस्वी व्यक्तींचा सन्मान करून साजरा करायला हवा. या कार्यक्रमात ज्या त्रुटी राहिल्या असतील, काही असुविधा झाली असेल, तर त्याविषयी मी क्षमा मागतो. या माऊलींच्या भूमीत माऊलींप्रमाणे मन मोठे करून ते विसरून जा. जेथे अशा प्रकारचे कार्यक्रम होतील, तेथे जाऊन तेथील त्रुटी विसरून जा आणि संघटन भक्कम होण्यासाठी एकसंध रहा. धर्म-संस्कृती यांना वाचवा, तर भारत वाचेल. आज देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. स्वतःसाठी जगलात तर मेलात, दुसर्यासाठी मेलात तर जगलात !
संत आणि मान्यवर यांनी काढले गौरवोद्गार !
सनातन वैदिक संस्कृतीच्या रक्षणात महाराष्ट्राचे मोठे स्थान आहे ! – प.पू. जगद्गुरु शंकराचार्य प.पू. विजयेंद्र सरस्वती महाराज, कांची कामकोटी पीठाधीश
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले. सर्वाधिक ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक या भूमीत आहेत. सैन्याध्यक्ष पण महाराष्ट्राचे आहेत. सैन्य आणि सेवा यांचा संगम महाराष्ट्रात आहे. सनातन वैदिक संस्कृतीच्या रक्षणात महाराष्ट्राचे मोठे स्थान आहे. धार्मिक वर्चस्व आहे. आळंदी येथील हा कुंभमेळा सर्वांना आपलेसे करणारा आहे. सर्वांना सुखी आणि समृद्ध आयुष्य जगता येवो असे आशीर्वाद !
जुना आखाडा पीठाधीश पू. अवधेशानंद गिरिजी महाराज
पू. स्वामी करत असलेले श्रीमद्भगवद्गीता आणि वेद यांचे रक्षण अन् प्रसार-प्रचार यांचे कार्य अद्भूत आहे.’’ पू. रमेशभाई ओझा म्हणाले, ‘भारत आणि स्वामी यांचा अमृत महोत्सव आहे. भारत आणि स्वामी यांच्यात एकरूपता आहे. शक्ती आणि भक्ती यांचा संगम स्वामी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण साजरा करत आहोत. श्रीमद्भगवद्गीता हा वैश्विक ग्रंथ बनावा, असे आम्हाला वाटते.
योगऋषि बाबा रामदेव
महाराष्ट्राने शक्ती, भक्ती, शौर्य आणि ज्ञान दिले. पूज्य स्वामीजी वेद, उपनिषदे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र सांगणारे संत आहेत. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करून देशाला सांस्कृतिक नेतृत्व देण्याचे कार्य स्वामीजींनी केले आहे. आता रामराज्य आणण्यासाठी योग आणि धर्म यांची कास आपण धरली पाहिजे.
मूळच्या अमेरिकी असलेल्या; पण हिंदु धर्माची दीक्षा घेतलेल्या साध्वी भगवती सरस्वती
भारतीय संस्कृती माझ्या रक्तात नाही; पण माझ्या डोळ्यांत सामावलेली आहे. प.पू. गोविंददेव गिरि महाराज ज्ञान, भक्ती आणि भाव यांचा संगम आहेत. अमेरिकेत ‘टाईम्स स्क्वेअर’मध्ये उणे अंश तापमानात ‘जय श्रीराम’चा जयघोष होणे, ही भारतीय संस्कृतीची महानता आहे. जगातील सर्व समस्यांचे समाधान भगवद्गीतेत आहे.
स्वामीजींनी घरोघरी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी पोचवण्याचे कार्य केले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
श्रीरामाची स्थापना जनलोकांकडूनच व्हावी, ही संकल्पना विश्वस्तांनी मनात ठेवून त्यानुसार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. पण ते श्रीकृष्णाची प्राणप्रतिष्ठापना केल्याविना स्वस्थ बसणार नाहीत. घरोघरी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी पोचवण्याचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्र आहे म्हणून आज हे राष्ट्र आहे. येथे येणे आणि संतांचे आशीर्वाद मिळणे, हे माझे भाग्यच आहे. स्वामीजी अनेक वर्षांपासून गीतेच्या शिकवणीचा सक्रीयपणे प्रचार करत आहेत आणि गीतेतील ज्ञान सर्वांसमोर सोप्या पद्धतीने मांडल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
मंत्री चंद्रकांत पाटील
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा पाठिंबा शासनाला द्यावा. पूर्वी ज्याप्रमाणे धर्मसत्ता राजाला सांगत असे की, ‘अहं दंडास्मि ।’ त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत रहावे, ही प्रार्थना करतो.
योगी आदित्यनाथ यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन !उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले, तसेच ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, विकास ढगे आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. या प्रसंगी विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी योगी आदित्यनाथ यांना मंदिरातील सर्व माहिती दिली. |