जळगाव – जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ९ फेब्रुवारी या दिवशी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या ‘योगशास्त्र’ आणि ‘शिक्षणशास्त्र’ विभागाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. या वेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
परभणी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी मुलींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याविषयी म्हटले होते. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी अशा ६४२ आणि नव्याने चालू होणार्या २०० अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही, असे पाटील म्हणाले.