श्रीराममंदिर सोहळ्यानंतर हिंदूंवर आक्रमणे करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – धनराज जगताप, हिंदु महासभा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या वतीने निवेदन स्वीकारतांना तहसीलदार नीलेश पाटील (डावीकडे), निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

सातारा, १० फेब्रुवारी (वार्ता.) – अनुमाने ५०० वर्षांच्या रक्तरंजित इतिहासानंतर आणि ७० वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाने हिंदूंना अयोध्या येथे श्रीराममंदिर उभारता आले आहे. हा आनंदोत्सव साजरा करत असतांना काही समाजकंटकांकडून देशभरात हिंदूंवर आक्रमणे केली जात आहेत. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. धनराज जगताप यांनी केली.

‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’च्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हिंदूंकडून हा सोहळा साजरा होत असतांना काही समाजकंटकांडून हिंदूंवर आक्रमणे करणे, वाहने आणि सार्वजनिक संपत्तीची तोडफोड करणे, हिंदु महिलांवर आक्रमण करणे, श्रीरामाविषयी बेताल वक्तव्ये करणे, असे प्रकार चालू आहेत. यातून देशाची अखंडता, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जात आहे. त्यामुळे संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.’

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे यांनी संत बाळूमामा देवस्थानामध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. विश्व हिंदु परिषदेचे श्री. जितेंद्र वाडेकर आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती डाफळे यांनीही आंदोलनाला संबोधित केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या नावे तहसीलदार नीलेश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.