‘Gemini’App Better:अभ्यासांती निष्कर्ष : गूगलचे ‘जेमिनी’ एआय अ‍ॅप ‘चॅटजीपीटी’पेक्षा अधिक सरस !

  • गूगलने त्याची ‘बार्ड’ प्रणाली केली निवृत्त !

  • टेक्नोलॉजी (तंत्रज्ञान) वार्ता

न्यूयॉर्क (अमेरिका) – सध्याचे जग हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेकडे झुकत आहे. त्यातही ‘चॅटजीपीटी’ या एआय प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो. आपले काम अनेक पट गतीने करण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे. अशातच गूगलने ‘चॅटजीपीटी’शी स्पर्धा करण्यासाठी ‘जेमिनी’ ही प्रणाली आणली आहे. अनेक निकषांवर जेमिनी ही ‘चॅटजीपीटी’पेक्षा अधिक सरस असल्याचा तज्ञांचा अभ्यास समोर येत आहे.

काय आहे गूगलची ‘जेमिनी एआय अ‍ॅप’ प्रणाली ?

१. ‘जेमिनी एआय अ‍ॅप’ हे ‘बार्ड’आणि ‘ड्यूएट एआय’ या प्रणालींच्या प्रगत वैशिष्ट्यांचे मिश्रण आहे.
२. वापरकर्त्यांना हवी ती माहिती देण्यासह ते ‘कोडिंग’ आणि नोकरी शोधणार्‍यांना मुलाखतीसाठीही साहाय्य करील.
३. विविध ‘व्हर्जन’मध्ये असणारे हे अ‍ॅप ‘गूगल वन’च्या ‘प्रीमियम प्लॅन’सह उपलब्ध आहे. १०० जीबी प्रांरभी योजना ही १३० रुपये प्रतिमहा आहे, तर ५ टीबी (५ सहस्र जीबी) योजना १ सहस्र ९३० रुपये प्रतिमहा ठेवण्यात आली आहे. मर्यादित वापरासाठी विनामूल्य आवृत्तीही उपलब्ध आहे.

‘चॅटजीपीटी’ आणि ‘जेमिनी’ यांच्यातील तुलना !

१. विषयाचा सखोल अभ्यास : दोन्ही एआय प्रणालींना काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रश्‍न विचारण्यात आले. यात जेमिनीने संकल्पना सखोलपणे समजावून सांगितल्या. चॅटजीपीटी मात्र हे करू शकले नाही आणि दोनदा ‘क्रॅश’ झाले. (बंद पडले.)

२. एकावेळी एकाहून अधिक कार्य करण्याची क्षमता (मल्टिटास्किंग) : जेमिनी एकाच वेळी मजकूर, कोड, ऑडिओ, प्रतिमा (इमेजेस) इत्यादींवर काम करू शकते, तर ‘चॅटजीपीटी’मध्ये ते वैशिष्ट्य नाही. जेमिनी इमेजेस आणि ऑडिओ यांना प्रतिसाद देते.

३. तांत्रिक चाचणी : ‘डीपमाइंड’ या आस्थापनाच्या अहवालानुसार, जेमिनीने ‘मॅसिव्ह मल्टिटास्क लँग्वेज अंडरस्टँडिंग बेंचमार्क’ चाचणीत ९०.०४ टक्के गुण मिळवले. मानवी तज्ञांची कामगिरी ८९.८ टक्के, तर चॅटजीपीटीला ८६.४ टक्के गुण प्राप्त झाले.

४. अचूकतेत जेमिनी, तर सर्जनशील लेखनात चॅटजीपीटी सरस : तथ्यात्मक अचूकता आणि तर्क क्षमता यांना प्राधान्य असेल, तर जेमिनी अधिक चांगले आहे. दुसरीकडे सर्जनशील लेखन, कथा सांगणे आणि परवडण्याच्या दृष्टीने चॅटजीपीटी अधिक चांगले आहे.