‘स्वतःचा आत्मघात करण्यासह इतर हिंदूंचाही घात करत आहोत’, याचे भान नसलेले जन्महिंदू !

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदू !

४ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आतंकवाद्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची मुसलमानांची मानसिकता, हिंदुद्वेष्ट्यांची मुसलमानांना खुश ठेवण्याची मानसिकता हिंदूंच्या मुळावर उठणारी आणि ‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘आतंकवादी हिंदु’ या शब्दांचा शोध हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनीच लावणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/761277.html

८. आतंकवाद्यांच्या चकमकीत पोलीस निरीक्षक हुतात्मा होऊनही ती चकमक बनावट असल्याचे सांगणारे हिंदुद्वेष्टे नेते !

या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांच्या मनात हिंदू आणि त्यांच्या धर्माविषयी जेवढी द्वेषाची भावना आहे, तेवढीच प्रेमाची अन् सहानुभूतीची भावना मुसलमान आतंकवाद्यांविषयी आहे. अपघाताने जन्मलेल्या या हिंदु नेत्यांचा एकीकडे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न असतो, तर दुसरीकडे मुसलमान आतंकवाद्यांना निर्दाेष ठरवण्याचा प्रयत्न असतो, हे वास्तव अनेक वेळा सिद्ध झाले आहे. १९ सप्टेंबर २००८ या दिवशी देहलीत झालेल्या साखळी बाँबस्फोटातील इंडियन मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी देहलीतील जामिया नगरातील ‘बाटला हाऊस’मध्ये लपल्याची वार्ता गुप्तचर यंत्रणेला कळाली. तेव्हा देहलीचे पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांनी सहकार्‍यांसह बाटला हाऊसवर धाड टाकली. या वेळी झालेल्या चकमकीमध्ये २ आतंकवादी मारले गेले, तर २ आतंकवादी पळून गेले, तर एक आतंकवादी जिवंत पकडला गेला; पण दुर्दैवाने या चकमकीत मोहनचंद शर्मा हुतात्मा झाले. पुढे मोहनचंद शर्मा यांना ठार करून पळून गेलेला आतंकवादी अरिश खानला पकडून फाशीची, तर दुसरा आतंकवादी शहजाद अहमदला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी अनेक हिंदुद्वेष्ट्या नेत्यांच्या डोळ्यांत आतंकवाद्यांच्या मृत्यूमुळे अश्रूंच्या धारा लागल्या होत्या; पण देशाच्या सुरक्षेसाठी हुतात्मा झालेल्या मोहनचंद शर्मा यांच्यासाठी गाळायला त्यांच्या डोळ्यांत अश्रूंचा एक थेंबही उरला नव्हता ! अनेक काँग्रेस नेत्यांसमवेत ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अमरसिंह, हिंदुद्वेषाचा वसा घेतलेले काँग्रेसचे दिग्विजयसिंह अशा अनेक हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी ‘ही चकमक बनावट (खोटी) होती’, असे अत्यंत निर्लज्जपणाचे वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले होते.

९. हिंदुद्वेष्ट्या नेत्यांजवळ या प्रश्नांची उत्तरे आहेत का ?

फेब्रुवारी २०२२ मध्ये उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे अल हजरत बरेली शरीफचे मौलाना तौकीर यांनी तर बेशरमपणाची मर्यादा पार केली होती. ते म्हणाले, ‘‘बाटला हाऊसची चकमक खोटी होती. त्यात मारले गेलेले आतंकवादी नव्हते, तर आमची निष्पाप मुले होती. या तरुणांना हुतात्म्याचा दर्जा मिळाला पाहिजे.’’ हे वक्तव्य ऐकून प्रश्न असे पडतात की, बाटला हाऊसच्या चकमकीत मारले गेलेले आतंकवादी नव्हते, तर निष्पाप मुले होती, तर मग ती लपली का होती ? निष्पाप मुलांजवळ घातक बंदुका कशासाठी होत्या ? बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण या निष्पाप मुलांनी का घेतले होते ? चकमकीत मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांना हुतात्म्याचा दर्जा द्यायचा म्हटले, तर प्रत्यक्ष हुतात्मा झालेले मोहनचंद शर्मा यांना कोणता दर्जा द्यायचा ? एखाद्या मौलानाला एवढे निर्लज्जपणाचे वक्तव्य करण्याचे धैर्य या देशात कसे काय होऊ शकते ? या मौलानाला देशद्रोही वक्तव्याविषयी अटक न होता काँग्रेस पक्षात प्रवेश कसा दिला जातो ? काँग्रेस पक्षातील एकही हिंदु नेता किंवा कार्यकर्ता मौलानाला जाब का विचारत नाही ? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे, ‘मौलानापेक्षा अपघाताने जन्मलेले जन्महिंदूंच या देशासाठी अधिक घातक आहेत !’

१०. क्रूरकर्मा याकूबची फाशीची शिक्षा रहित करण्याच्या निवेदनावर २७ हिंदूंनीही स्वाक्षरी करणे !

श्री. शंकर गो. पांडे

वर्ष १९९३ मध्ये मुंबईत १२ ठिकाणी बाँबस्फोट होऊन त्यात २५७ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता आणि ९०० जण गंभीररित्या घायाळ झाले होते. पुढे या बाँबस्फोटांची चौकशी होऊन नृशंस कृत्यातील मुख्य आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली गेली. सर्व कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनीही याकूब मेमनची दयेची याचिका फेटाळली. याकूबला आता फाशी होणार, हे पाहून या देशातील अनेक हिंदुद्वेष्टे नेते, अभिनेते, पत्रकार, तथाकथित पुरो(अधो)गामी म्हणून मिरवणारे बुद्धीवादी या सर्वांचे गळे दाटून आले. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. याकूब मेमनने असा काय मोठा गुन्हा केला होता ? त्याने आपल्या धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे केवळ २५७ काफिरांना कीड्यामुंग्यांसारखे मारले होते. त्याच्या या धर्मकृत्याविषयी त्याला काय एकदम अशी फाशीची शिक्षा व्हावी ? मग याकूब मेमनवरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी प्रशांत भूषण या मानवतावादी अधिवक्त्याच्या नेतृत्वाखाली १२ मानवाधिकारवाल्यांचा एक चमू सिद्ध झाला आणि त्याने अर्ध्या रात्री ३ वाजता सर्वाेच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्यास बाध्य केले. दयाळू न्यायालयानेही त्याचे दरवाजे इतक्या अपरात्री उघडले; पण याचाही काही लाभ झाला नाही. मग समाजातील ४० ‘लिबरल’ म्हणजे उदारमतवादी एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या स्वाक्षर्‍यांचे एक निवेदन राष्ट्रपतींना पाठवून त्याद्वारे ‘याकूब मेमनची फाशीची शिक्षा रहित (माफ) करावी’, अशी विनंती केली. विस्तारभयास्तव त्यांची नावे देत नाही; पण ज्या ४० जणांनी निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या, त्यात १३ मुसलमानांसमवेत त्यांच्या दुपटीने, म्हणजे २७ हिंदूंचाही समावेश होता. क्रूर आणि धर्मांध असूनही एका आतंकवाद्याची फाशीची शिक्षा रहित व्हावी म्हणून मुसलमान समाजाकडून प्रयत्न होणे साहजिक आहे; कारण काफिरापेक्षा आपला धर्मबंधू त्यांना अधिक जवळचा असतो. काफीर कितीही श्रेष्ठ असला, तरी त्याच्यापेक्षा आपला फाटका धर्मबंधू मुसलमान अधिक महत्त्वाचा वाटतो. ‘मला गांधींपेक्षा एखादा फाटका मुसलमान अधिक जवळचा अाहे’, असे उद्गार एकदा पाकिस्तानचे जन्मदाते महंमद अली जिन्ना यांनीही काढले होते. मुसलमानांच्या या मानसिकतेमुळेच आतंकवादी याकूब मेमन याच्या मुंबई येथील अंत्ययात्रेला २ लाखांचा मुसलमान समुदाय सामील झाला होता. वैषम्य याचे वाटते की, क्रूरकर्मा याकूबची फाशीची शिक्षा रहित करावी, यासाठी केलेल्या निवेदनावर २७ हिंदूंनीही स्वाक्षरी करावी ? या स्वाक्षर्‍या करणार्‍यांच्या नातेसंबंधातील एखाद्या जवळच्या नातेवाइकाचा मेमनने केलेल्या बाँबस्फोटात मृत्यू झाला असता, तर त्याने स्वाक्षरी केली असती का ?

११. मुसलमान उच्चविद्याविभूषित झाला, तरी त्याच्या कट्टर मानसिकतेमध्ये कोणताच फरक पडत नसणे !

‘मुसलमान समाजात अशिक्षित आणि गरीब लोकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांना धर्माच्या नावावर भडकावणे सोपे जाते’, असे म्हणावे, तर मुसलमान उच्चविद्याविभूषित झाला, तरी त्याच्या कट्टर मानसिकतेमध्ये कोणताच फरक पडत नाही, असेही दिसून येते. फासावर चढवला गेलेला याकूब मेमन हा व्यवसायाने लेखापरीक्षक (चार्टर्ड अकाऊंटंट) होता; पण शिक्षणाने त्याच्या कट्टर मानसिकतेत कोणताही पालट झाला नाही. शेवटी त्याने धर्माच्या शिकवणीप्रमाणे काफिरांना ठार करण्यासाठी हातात शस्त्र घेतलेच. ‘अल कायदा’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आसोमा बिन लादेन हा स्थापत्य अभियंता तर होताच; पण कोट्यधीशही होता; पण त्याने त्याची बुद्धी विध्वंस घडवण्यात, तर संपत्ती आतंकवादी निर्माण करण्यात खर्च केली. ओसामानंतर अल कायदाच्या प्रमुखपदी विराजमान झालेला बगदादी याने ‘इस्लामिक स्टडीज्’मध्ये ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली होती. भारतीय संसदेवरील आक्रमणाच्या प्रकरणात फासावर लटकवला गेलेला महंमद अफझल हा ‘एम्.बी.बी.एस्.’पर्यंत शिकलेला होता. लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याने दोन विषयांत पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या आहेत. अमेरिकेत केलेल्या ड्रोन आक्रमणात मारला गेलेला अल कायदाचा आतंकवादी आयाम-अल-झरदारी एम्.एस्., म्हणजे शल्यकर्मचिकित्सक (सर्जन) होता; पण एवढे शिक्षण घेऊनही शेवटी धर्मासाठी त्यांनी हातात शस्त्रे घेतलीच.

१२. उच्चविद्याविभूषित हिंदूंना धर्मनिरपेक्षतेची नशा चढणे !

याउलट हिंदूंमधील सुशिक्षितांची अवस्था आहे. हिंदु उच्चविद्याविभूषित झाला की, तो अधार्मिक होतो. धर्म त्याला आपल्या जीवनातील अडगळ वाटू लागते. ते ‘आपल्याच धर्माची चिरफाड करणे, आपल्याच धर्माची टिंगलटवाळी करणे’, यालाच पुरोगामित्व मानतात. आपल्या देवीदेवतांची टिंगल करणारे चित्रपट आवडीने पहातात. हे हिंदू उच्चविद्याविभूषित तर असतात; पण संस्कारित नसतात. भारतीय सणवार, उत्सव त्यांना फालतू वाटू लागतात. त्यांच्यावर धर्मनिरपेक्षतेची नशा एवढी चढलेली असते की, ‘याकूब मेमन सारख्या क्रूर आतंकवाद्याची फाशीची शिक्षा रहित व्हावी’, यासाठी जिवाचा आटापिटा करतात. अशा या अपघाताने जन्मलेल्या हिंदूंना ‘आपण आत्मघात तर करत आहोतच; पण इतर हिंदूंचाही घात करत आहोत’, याचे भान नसते.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

संपादकीय भूमिका

हिंदु उच्चविद्याविभूषित झाला की, तो अधार्मिक होतो अन् अन्य कट्टरपंथीय उच्चशिक्षित झाले, तरी धर्मासाठी हातात शस्त्र घेतात !