राहुरी (नगर) येथे निर्घृण हत्या झालेल्या अधिवक्ता दांपत्याच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मोर्चा !

अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर अधिवक्त्यांचा मोर्चा !

आंदोलनात सहभागी झालेले अधिवक्ते

अहिल्यानगर – येथील राहुरी येथे निर्घृण हत्या झालेल्या आढाव अधिवक्ता दांपत्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील अधिवक्त्यांनी ९ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य फाटक बंद असल्याने अधिवक्ता आक्रमक झाले होते. अधिवक्त्यांसह अनेक अधिवक्ता फाटकावर चढले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने बाटल्या फेकल्या. या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार संग्राम जगताप सहभागी होते.

महाराष्ट्रात ‘वकील संरक्षण कायदा’ करावा, राहुरीतील गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयापुढे चालावा, खटला चालवण्यासाठी सरकारकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशाही मागण्या मोर्चेकरी अधिवक्त्यांनी केल्या.

काय आहे प्रकरण ? 

राहुरीतील मानोरी गावातील अधिवक्ता राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची १५ दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली. त्यानंतर ‘वकील संरक्षण कायदा करावा’ या मागणीसाठी जिल्ह्यातील अधिवक्त्यांनी आंदोलन पुकारले होते. मोर्चाद्वारे अधिवक्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने प्रत्येक तालुक्यातील अधिवक्ता संघटनांच्या पदाधिकार्‍यांना प्रवेश देत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घडवून आणली. अधिवक्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. आमदार सत्यजित तांबे यांनीही मोर्चेकरी अधिवक्त्यांची भेट घेतली.

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देतांना अधिवक्त्यांचे शिष्टमंडळ