४० टक्के विद्यार्थी किंवा पालक यांनी अंड्याला विरोध केल्यास विद्यार्थ्यांना फळे देण्यात येतील !

धार्मिक संस्थांच्या विरोधानंतर राज्य सरकारचा निर्णय !

मुंबई – शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात अंडी देण्याच्या निर्णयाला शहरातील धार्मिक संस्थांनी विरोध केला. ‘४० टक्के विद्यार्थी किंवा पालक यांनी अंड्याला विरोध केल्यास विद्यार्थ्यांना फळे देण्यात येतील’, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी नवा अध्यादेशही जारी केला आहे.

राज्य सरकारने सरकारी शाळांमध्ये शिकणार्‍या सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार देण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांना पोषण आहारात खिचडीऐवजी अंड्याचा पुलाव आणि बिर्याणी, मिठाई, भाज्या आणि फळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इस्कॉनचा आरोप !

‘शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात अंडी देण्याच्या निर्णयामुळे कुक्कुटपालन उद्योगाला लाभ होणार आहे. पंतप्रधान पोषण योजनेमध्ये अंडी देण्याची कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. तसेच कोणत्याही पालकांनी अंड्यांची मागणी केलेली नाही. महाराष्ट्रातील ४० टक्के लोकसंख्या शाकाहारी असतांना राज्य सरकारचा हा निर्णय कुक्कुटपालन उत्पादकांसाठी घेण्यात आला आहे’, असा आरोप इस्कॉनचे विराग शाह यांनी केला आहे.