सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेने विज्ञापन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विज्ञापनांचे फलक लावणार्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पालिकेने या फलकांविषयी ४० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे. सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून ६ फेब्रुवारी या दिवशी ही कारवाई करण्यात आली. या वेळी ४ फलक कह्यात घेण्यात आले असून प्रत्येकी १० सहस्र रुपये दंडाची नोटीस संबंधितांना पाठवली आहे. या वेळी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचार्यांना काहींनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला; मात्र अतिक्रमण विभागाने कुणालाही न जुमानता ही कारवाई केली आहे.
सातारा नगरपालिकेने शहरातील ५ ठिकाणे ‘जाहिरात प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये शिवतीर्थ परिसराचाही समावेश आहे. तरीही प्रशासनाच्या आदेशाला काही स्वयंघोषित नेते आणि व्यावसायिक यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवतीर्थावर काही मंडळींकडून मोठमोठे फलक लावून शिवतीर्थाचे विद्रुपीकरण केले जात आहे. अनेक वेळा फ्लेक्स लावण्याविषयी स्वयंघोषित नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि नगरपालिका कर्मचारी यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग घडले आहेत. याची गंभीर नोंद घेत पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी विज्ञापन प्रतिबंधक क्षेत्रामध्ये फलक लावणार्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही काही राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि व्यावसायिक यांच्याकडून शिवतीर्थावर विज्ञापनांचे फलक लावले आहेत. शेवटी नाईलाजास्तव अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह पथकाने घटनास्थळी जात चारही फलक कह्यात घेऊन संबंधितांना दंडाची नोटीस दिली आहे.