‘गीता परिवारा’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन लर्न गीता’ उपक्रम

‘ऑनलाईन लर्न गीता’ उपक्रमाचे पत्रक (मराठी)

आळंदी (जिल्हा पुणे) – वर्ष १९८६ मध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘गीता परिवारा’ची स्थापना केली. या माध्यमातून अनेक शिबिरांचे आयोजन त्याचप्रमाणे संस्कार केंद्रांचे व्यवस्थापन केले जाते. समाजातील मुलांसाठी योग शिक्षण, शाळा-महाविद्यालयांमध्ये नैतिक मूल्यशिक्षण, भारतीय पौराणिक महानाट्यांचे सादरीकरण, तसेच गीता महोत्सवांचे आयोजन केले जाते. या माध्यमांतून आतापर्यंत ७५ कोटी सूर्यनमस्कारांचे आयोजन केले आहे. ‘गीता परिवारा’च्या माध्यमातून ‘श्रीमद् भगवद्गीता’ शिक्षण दिले जात होते; परंतु कोरोनाच्या कालखंडांमध्ये याचे रूपांतर ‘ऑनलाईन लर्न गीता’ (गीता शिका) या उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यात आले.

आज जगभरातील १८१ देशांमध्ये १३ भाषांमध्ये ‘लर्न गीता’च्या माध्यमातून प्रचार-प्रसार, उच्चार आणि आचरण यांचे शिक्षण दिले जाते. यामध्ये ८ सहस्र अध्यापकांचा समावेश असून ८ लाखांपेक्षा अधिक लोक गीता शिकत आहेत.

‘ऑनलाईन लर्न गीता’ उपक्रमाचे पत्रक (इंग्रजी)

१३ भाषांमध्ये ‘श्रीमद्भगवद्गीता’  ग्रंथ रूपाने प्रसिद्ध !

आज ‘गीता परिवारा’च्या माध्यमातून मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलगू, सिंधी, तमिळ, कन्नड, उडिया, बंगाली, नेपाली, गुजराती अशा भाषेमध्ये ग्रंथरूपाने गीता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ग्रंथांचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक अध्याय संपल्यानंतर ‘बारकोड’ देण्यात आला आहे. हा ‘बारकोड’ स्कॅन केल्यानंतर तो अध्याय ‘अ‍ॅडिओ’ (ध्वनीमुद्रित) मिळतो. त्यामध्ये श्लोकांचा योग्य उच्चार आणि त्यांचा अर्थ सांगितला जातो.

अनेक भाषांतील जाणकार, पंडित यांचे साहाय्य

‘ऑनलाईन लर्न गीता’ हा उपक्रम चालू झाल्यानंतर देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक भाषांमध्ये गीता ऐकण्यास, वाचण्यास लोकांचा संपर्क होऊ लागला. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या देशभर भ्रमण आणि प्रचारातून त्या-त्या भाषेतील तज्ञ मंडळींनी गीतेचे भाषांतर करण्यास विनामूल्य साहाय्य केले. समाजातून अनेक लोक पुढे येऊन साहाय्य करण्यास सिद्ध झाले. त्यांच्या साहाय्याने आज १३ भाषांमध्ये गीता ग्रंथरूपाने प्रसिद्ध करता आली.

प्रतिदिन २ सहस्र २०० ‘झूम’ प्रणालीद्वारे वर्ग

ऑनलाईन ‘लर्न गीता’ या माध्यमातून पहाटे ५ ते रात्री २ वाजेपर्यंत (अमेरिकेतील छात्रांसाठी) वर्ग चालतात. प्रत्येक वर्ग हा ४० मिनिटांचा असून तो आठवड्यातील ५ दिवस चालतो. यामध्ये गीतेमधील श्लोकांचा शुद्ध उच्चार, सरळ पद्धतीने अर्थ याचे शिक्षण दिले जाते. साप्ताहिक अर्थ विवेचन सत्राचे आयोजन केले जाते.