राज्यातील शिशू ते ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरणार !

मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांचे शिशू ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरवण्यात यावेत, असा आदेश राज्यशासनाने काढला आहे. पालटलेल्या आधुनिक जीवनशैलीमुळे लहान मुलांना सकाळी लवकर उठण्यास अडचण येत असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये राजभवनात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी भाषणामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेविषयी विचार करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला दिली होती. राज्यपालांच्या या सूचनेविषयी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राज्यातील शिक्षणतज्ञ, पालक, प्रशासकीय अधिकारी यांचे अभिप्राय नोंदवण्यासाठी गूगल लिंक उपलब्ध करून दिली होती. या सर्व अभिप्रायांचा विचार करून इयत्ता ४ थीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजता भरवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मनोरंजनाची विविध साधने, शहरात उशिरापर्यंत चालू असलेले ध्वनीप्रदूषण आदी कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपतात. सकाळी शाळा लवकर असल्यामुळे विद्यार्थ्यांना पालक लवकर उठवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. झोप अपूर्ण राहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हिवाळा, पावसाळा आदी ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून जाण्यास विद्यार्थ्यांना कठीण जाते. अशा विविध कारणांमुळे हा निर्णय शासनाने घेतला आहे. यासह रात्रशाळेची वेळ रात्री ९ वाजताची करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

शाळांच्या वेळा पालटल्याने ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’ ही शिकवण मुले कधी आचरणात आणणार ?