१. रात्री झोपतांना स्वतःत आध्यात्मिक बळ (चैतन्य) आल्याचे जाणवून कसलीही भीती न वाटणे, मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच रूप असून त्यांना अनुभवत असणे
‘एकदा रात्री १२.३० ते १ या वेळेत मी झोपण्यासाठी पहुडले होते. त्या वेळी माझ्यात एवढे आध्यात्मिक सामर्थ्य आले होते की, सप्तलोक, चारही दिशा आणि पंचतत्त्वे यांच्यापैकी मला कुणाचेही भय वाटत नव्हते. माझ्याकडे कोणतीही दुष्ट शक्ती पाहू शकत नव्हती आणि पाहू शकणारही नव्हती. दुष्ट शक्तीचे चुकून जरी माझ्याकडे लक्ष गेले, तरी ती शक्ती तेथूनच घाबरून पळून जाईल, एवढे माझ्यात चैतन्य होते. माझ्यातील चैतन्यामुळे माझ्याकडे पहाण्याचे कुणीही धाडस करणार नाही. माझ्यात तेजतत्त्व एवढे होते की, माझ्या दिशेने एक पाऊल जरी पुढे टाकण्याचा कुणी प्रयत्न केला, तरी ती शक्ती जळून खाक होईल. मी निर्भय आणि निश्चिंत होते. माझ्या मनात प.पू. डॉक्टरांचेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच) रूप होते. माझे मन निर्विचार होते. मी आतून प.पू. डॉक्टरांना अनुभवत होते.
२. स्वतः ब्रह्मांडात असून ईश्वर म्हणजे सृष्टीचा पालनकर्ता असल्याचे जाणवणे
तेव्हा मला पुढील दृश्य दिसले. पृथ्वीवर चारही बाजूंनी आकाश टेकलेले होते. एक मोठे ब्रह्मांड होते. त्या ब्रह्मांडात मी, म्हणजेच प.पू. डॉक्टर पहुडले होते. मी प.पू. डॉक्टर, म्हणजेच ईश्वर होते. चारही बाजूला निळसर आकाश होते. माझा वर्ण आकाशासारखा म्हणजे श्रीकृष्णासारखा फिकट निळसर होता. मला सर्वत्र शांती जाणवत होती. ईश्वर एकटाच ब्रह्मांडात असूनही तो पृथ्वीतलावरील प्रत्येक मानव आणि जीवसृष्टी यांकडे पहात असतो. पृथ्वीतलावर होणारी प्रत्येक गोष्ट त्याची इच्छा आणि कृपा यांमुळे घडत असते. मीही तेव्हा ईश्वर, म्हणजे पालनकर्ता होते. प.पू. डॉक्टर म्हणजेच ईश्वर आणि ईश्वर म्हणजेच प.पू. डॉक्टर होते. मी अनुभवलेली प.पू. डॉक्टरांची अवस्था शब्दांत सांगू शकत नाही. केवळ प.पू. डॉक्टरच ती जाणू शकतात. याच अवस्थेत मी झोपी गेले. दुसर्या दिवशी सकाळी जाग आल्यावर मला पुष्कळ उत्साह वाटत होता.
३. प.पू. डॉक्टरांचे आध्यात्मिक बळ लक्षात येऊन ते ‘अवतारच’ आहेत, असे जाणवणे
साधना केल्याने गुरु साधक आणि शिष्य यांच्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण करतात. प.पू. डॉक्टरांमध्ये किती सामर्थ्य (आध्यात्मिक बळ) आहे, हे मी अनुभवले. तेव्हा प.पू. डॉक्टर ‘अवतारच’ आहेत, हे मला जाणवले. प.पू. डॉक्टर, तुमचे पाठबळ माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी ज्या लोकात असेन, तेथे निश्चिंत असेन. तुम्ही त्रैलोक्यात जेथे असणार तेथून तुमची माझ्यावर दृष्टी असणार आहे. त्यामुळेच मला कोणत्याही लोकात भीती नाही. हे सिद्धच झाले आहे आणि मी अनुभवलेही आहे.
वरील लिखाण प.पू. डॉक्टरांनीच माझ्याकडून लिहून घेतले. यासाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
रामाची दासी,
– सुश्री महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|