बारावीची २१ फेब्रुवारी तर, दहावीची १ मार्च या दिवशी होणार परीक्षेला प्रारंभ
रत्नागिरी (जिमाका) – माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी ) ची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) ची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली.
या परीक्षांसंदर्भांत ७ फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
या परीक्षांसाठी १० वी साठी १३ परिरक्षक, तर १२ वी साठी १२ परिरक्षक कार्यालये आहेत. १० वीसाठी एकूण ४२६ शाळांमध्ये मुख्य परीक्षा केंद्रे ७३ असून १८ सहस्र ३२३ विद्यार्थ्यांची संख्या आहे. १२ वी साठी १५४ कनिष्ठ महाविद्यालये ३८ मुख्य परीक्षा केंद्रे असून १७ सहस्र ४८९ विद्याथ्यांची संख्या आहे. जिल्ह्यात मागील ५ वर्षांमध्ये एकही संवेदनशील आणि उपद्रवी परीक्षा केंद्र आढळून आले नाही. एकूण सहा भरारी पथके जिल्ह्यात असणार आहेत.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस्.टी. पोचेल, अशी सुविधा ठेवावी. वीज वितरण कंपनीने वीज सुरळीत राहील, याचे दायित्व पूर्णपणे निभवावे.’’