Religious Education UK Schools : ब्रिटनच्या शाळांमध्ये येत्या एप्रिलपासून भारतातील विविध धर्मांचे शिक्षण मिळणार !

हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध धर्मांचे शिक्षण देण्यात येणार !

लंडन (ब्रिटन) – येत्या एप्रिलपासून प्रारंभ होणार्‍या शैक्षणिक सत्रापासून ब्रिटनच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच चौथी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील विविध  धर्मांच्या शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत. यात विद्यार्थ्यांना हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध धर्मांचे शिक्षण दिले जाणार आहे. ब्रिटनमध्ये धार्मिक शिक्षण १० पर्यंत सक्तीचे आहे. सध्या ख्रिस्ती धर्माचे शिक्षणच दिले जाते. (ब्रिटनमध्ये लोकशाही आहे आणि तो धर्मनिरपेक्ष देश असतांनाही तेथील शाळांमध्ये ख्रिस्ती धर्माचे शिक्षण दिले जाते, हे लक्षात घ्या ! जर ब्रिटन असे करू शकतो, तर ‘भारतात हिंदूंना धर्मशिक्षण आतापर्यंत का दिले गेले नाही ?’, असा प्रश्‍न हिंदूंनी आता विचारणे आवश्यक आहे ! – संपादक) ब्रिटनमधील भारतीय कुटुंबे आणि इतर संघटनांची पुष्कळ वर्षांपाूसन धार्मिक शिक्षणाची मागणी होती.

१. सरकारच्या निर्णयामुळे ८८ लाख श्‍वेतवर्णीय आणि अन्य वंशीय, तसेच ८२ सहस्र भारतीय वंशाचे विद्यार्थी यांना भारतीय धर्मांचे शिक्षण मिळणार आहे. या संदर्भात ब्रिटनच्या संसदेने निधीला संमती दिलेली आहे. यातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सरकारने भारतीय धार्मिक शिक्षणासाठी पुस्तकांची मागणी दिली आहे.

२. ब्रिटनमध्ये आतापर्यंत विश्‍व हिंदु परिषद यूके आणि वैदिक शिक्षण संघटना (वॉयस) यांसारख्या संघटना भारतीय कुटुंबातील मुलांसाठी धार्मिक शिक्षणाचा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवतात.

शाळांमध्ये योग, आयुर्वेद, संस्कार शिक्षण, ध्यान आणि  वैदिक गणित हेही शिकवावे ! – भारतीय पालकांची मागणी

भारतीय धर्मांविषयीच्या गैरसमजातून भारतीय विद्यार्थ्यांचा होतो छळ !

‘इनसाईट यूके’ नावाच्या संघटनेच्या सर्वेक्षणानुसार ब्रिटनच्या शाळांमध्ये शिकणार्‍या प्रत्येक १० भारतीय विद्यार्थ्यांपैकी ५ जणांवर धर्माच्या नावाने गुंडगिरी होते. भारतीय मुलांसमवेत शिकणार्‍या ब्रिटीश मुलांना भारतीय धर्मांविषयी माहिती नसते. त्यांच्यात भारतीय धर्मांविषयी गैरसमज आहेत. यामुळे भारतीय मुलांचा छळ होतो. आता भारतीय धर्मांच्या शिक्षणाचा समावेश झाल्याने इतर समुदायाच्या मुलांनाही भारतीय धर्मांविषयीची माहिती मिळेल.

संपादकीय भूमिका

ब्रिटनच्या शाळेत हिंदु धर्माचे शिक्षण मिळणार; पण भारतात कधी मिळणार ? ‘भारतातील हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण कधी मिळणार ?’ असा प्रश्‍न आता येथील हिंदूंनी सरकारला विचारला पाहिजे !