बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चिपळूण येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा !

चिपळूण – चिपळूण हे माझे आजोळ आहे. आम्ही नाती जपणारे आहोत. सध्या संकटे आहेत; मात्र प्रत्येक संकट हे संधी घेऊन येते, असे माझ्या आजोबांनी शिकवलेले आहे. आम्ही पक्षप्रमुख नाही असे म्हणणार्‍यांनी २०१४ मध्ये माझा पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा का घेतला? तेव्हा आमची घराणेशाही दिसली नाही का ? आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे; मात्र देशातील आणखी एक मोठे न्यायालय आहे, ते जनतेचे न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे. बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येथील इंदिरा गांधी संस्कृती केंद्रासमोरील मैदानाच ठाकरे गटाची ५ फेब्रुवारी या दिवशी सभा पार पडली. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

या वेळी येथील सांस्कृतिक केंद्राचा परिसर भगवामय झाला होता. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार संजय कदम, रोहन बने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत यादव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहरप्रमुख शशिकांत मोदी, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, चिपळूण येथे महापुराच्या काळात विद्युत् पुरवठा खंडित झाल्याने येथे काहींना जीव गमवावे लागले त्यावर उपाययोजना म्हणून भूमिगत विद्युत्वाहिन्या टाकण्यासाठी आणि  पूरमुक्तीसाठी निधीची उपलब्धता करून दिली.