राज्यातील आर्.टी.ओ. कार्यालयांतील वाहन परवाना यंत्रणा ठप्प !

पुणे – गेल्या २ दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध ‘आर्.टी.ओ.’ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) कार्यालयांतील वाहन परवाना देण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे. परवान्याचे काम करणार्‍या ‘सारथी’चे सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यात एकही परवाना काढता आला नाही. पुणे आर्.टी.ओ.मध्ये प्रतिदिन ५०० वाहन परवाना काढले जातात; मात्र २ दिवसांत किमान १ सहस्र वाहनधारकांना फटका बसला आहे.

नानाविध कारणांमुळे नागरिकांना ‘आर्.टी.ओ.’ कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. ‘आर्.टी.ओ.’ने अन्य सुविधा चालू केली; मात्र त्यातही अनेक अडचणी येत आहेत. दोन दिवस सर्व्हर डाऊन आणि त्यात साप्ताहिक सुटी आल्याने सलग ४ दिवस कार्यालयातील काम न झाल्याने परवान्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी नागरिकांची असुविधा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्याचे ‘मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी सांगितले की, परिवहन विभागाकडून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो; मात्र त्या तुलनेत सुविधा मिळत नाही. परिवहन विभागाचे संकेतस्थळ आणि सर्व्हर अधिक चांगले होण्याची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासन याविषयी कधी पावले उचलणार ?