यजमान बेशुद्ध पडूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांना कोणतीही इजा न होता ते परत शुद्धीवर आल्याची साधिकेला आलेली अनुभूती

‘माझे पती श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७९ वर्षे) यांची २३ वर्षांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली असून ५ वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाला होता. त्यांना रक्तदाब, मधुमेह यांवर नियमित औषधे चालू आहेत. १९.१२.२०२३ या दिवशी रात्री २ वाजता ते अकस्मात् चक्कर येऊन खाली पडले आणि बेशुद्ध झाले. त्या वेळी मी अनुभवलेली गुरुलीला आणि गुरुकृपा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

१. रात्री पतींना चक्कर येऊन ते खाली कोसळणे आणि घरात एकटी असल्याने ‘प.पू. डॉक्टर’ असा धावा चालू केल्यावर थोडी शुद्ध येणे

सौ. सुलभा कुलकर्णी

१९.१२.२०२३ या दिवशी रात्री २ वाजता माझे पती श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७९ वर्षे) लघवीला जाण्यासाठी उठले. लघवीला जाऊन आल्यानंतर बेसिनपाशी हात धुतांना ते अकस्मात् चक्कर येऊन खाली पडले. त्या वेळी तिथे खाली ठेवलेल्या भांड्यांचा मोठा आवाज आला; म्हणून मी तिथे आले. तेव्हा त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. मला ब्रह्मांड आठवले. (सध्या आम्ही दोघेच सांगलीत रहातो.) लगेचच माझा ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’ असा धावा आपोआपच चालू झाला. त्या वेळी माझी आर्ततेने प्रार्थना झाली, ‘हे प्राणेश्वरा, अशा वेळी छातीवर कसा दाब द्यायचा, याचे मला ज्ञान नाही. आपणच ही कृती करवून घ्या.’ असे म्हणून मी त्यांच्या छातीवर दाब देण्यास आरंभ केला. इकडे धावा चालूच होता. काही वेळात मला घोरण्यासारखा आवाज ऐकू आला.

२. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आणि शेजार्‍यांचे साहाय्य घेतल्याने पूर्ण शुद्ध येणे आणि दुसर्‍या दिवशी रुग्णालयात भरती करणे

त्यांना मी उठवून बसवू शकत नव्हते. हळूहळू ते उठून बसले. त्यानंतर मी सुचेल, ते उपाय केले. लिंबूने दृष्ट काढली, उदबत्ती फिरवली, त्यांच्या जवळ जीवनदर्शन पुस्तिका दिली. जप चालू केला, तरी ते पूर्वस्थितीत येत नव्हते. देवानेच सुचवले आणि शेजारी रहाणार्‍या श्रावण यांना भ्रमणभाष केला. ते त्वरित आले. त्यांनी यजमानांना थोडी साखर आणि पाणी पिण्यास देण्यास सांगितले. नंतर ते थोडे जागे झाले. दुसर्‍या दिवशी १० वाजता आम्ही रुग्णालयात गेलो आणि त्यांना भरती केले. नंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि आम्ही दुसरे दिवशी घरी परतलो. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘रक्तदाब अल्प झाल्याने चक्कर आली असावी.’’

३. चक्कर येऊन अडचणीच्या जागी पडूनही कोणतीही इजा न होणे आणि ‘प्रल्हादाप्रमाणे गुरुदेवांनीच त्यांना झेलले आहे’, असे जाणवणे

इथे देवाच्या कृपेची अनुभूती अशी आली. ते जिथे चक्कर येऊन पडले, ती जागा अडचणीची होती. जवळच सोफा होता. बीमचे टोक बाहेर आले होते. ते एवढ्या जोरात पडूनही त्यांच्या डोक्याला, डोळ्यांना काहीही इजा झाली नाही. प्रल्हादाला जसे नारायणाने झेलले, तसेच या कलियुगात विष्णुस्वरूप गुरुमाऊलीने त्यांना झेलले. तो प्रसंग आठवला की, ‘कृतज्ञता’ हा शब्दही अपुरा वाटतो. त्यांना तीन वेळा जीवदान देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रती अनंत कोटी कृतज्ञ आहे.

शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं,

सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घणात ।
उभा पाठीशी एक अदृश्य हात ।

गुरु एक जगी त्राता ।
गुरु एक जगी त्राता ।।’

– सौ. सुलभा कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७४ वर्षे), गावभाग, सांगली. (२४.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक