रशिया-युक्रेन युद्ध
मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता २ वर्षे होत आली आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ ला चालू झालेल्या युद्धात पहिल्या ५०० दिवसांत रशियाचे ३ लाख १५ सहस्र सैनिक मारले गेले आहेत, असे एका अमेरिकी संस्थेने म्हटले होते. यावरून आता रशियच्या सैनिकांच्या पत्नी आणि कुटुंबीय सैनिकांना युक्रेनमधून माघारी बोलवावे, अशी मागणी करत आहेत. त्यांनी येथे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलन करणार्या २० लोकांना कह्यात घेतले आहे.
रशियाच्या सैनिकांची व्यथा !
१. युद्धात घायाळ झालेल्या रशियाच्या सैनिकांना हानीभरपाई दिली जात नसल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.
२. दुसरीकडे युक्रेनने दावा केला होता की, रशियाच्या सैनिकांमध्ये एक रहस्यमय रोग पसरत आहे. त्यामुळे सैनिकांचे डोळे लाल होऊन त्यांना उलट्या होत आहेत. त्यांचे मूत्रपिंडही निकामी होत आहे.
३. युक्रेनमध्ये लढणार्या सैनिकांना थंडीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच त्यांना औषधे, प्राथमिक उपचार, इतर वैद्यकीय सुविधा, उबदार कपडे मिळत नाहीत. युक्रेनमध्ये तापमान उणे ५ सेल्सियसवर पोचले आहे.
४. युद्धामुळे रशियाच्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याच्या पुतिन यांच्या प्रयत्नांना १५ वर्षांनी मागे टाकले आहे. या हानीवर मात करण्यासाठी रशिया आपल्या सैन्यात मुक्त झालेल्या बंदीवानांची भरती करत आहे आणि त्यांना रणांगणावर पाठवत आहे. रशियाकडे अनुमाने २० ते २५ लाख राखीव सैनिक आहेत.