आसाममध्ये ‘माँ कामाख्या कॉरिडोर’ होणार, पंतप्रधानांनी केली पायाभरणी ! (Maa Kamakhya Access Corridor)

४९८ कोटी रुपये खर्चाची अपेक्षा !

(कॉरिडोर म्हणजे प्रशस्त आणि सुसज्ज मार्ग)

माँ कामाख्या मंदिर कॉरिडोर

गौहत्ती (आसाम) – उज्जैन येथील महाकालेश्‍वर कॉरिडोर आणि वाराणसीतील काशी विश्‍वनाथ कॉरिडोर यांनंतर आता गौहत्ती येथील ‘माँ कामाख्या कॉरिडोर’ करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात माँ कामाख्या मंदिर कॉरिडोरसह आसाममधील ११ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. हा कॉरिडोर ४९८ कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणार आहे.

आपली मुळे नष्ट करून आणि भूतकाळ विसरून कुणीही यशस्वी होऊ शकत नाही ! – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

या वेळी जनतेला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांना स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते. आपली मुळे नष्ट करून आणि भूतकाळ विसरून कुणीही यशस्वी होऊ शकत नाही. आपली तीर्थक्षेत्रे, आपली मंदिरे, आपली श्रद्धास्थाने, ही केवळ भेट देण्याची ठिकाणे नाहीत. आपल्या संस्कृतीच्या सहस्रो वर्षांच्या प्रवासाची ही  चिन्हे आहेत.

गौहत्ती येथील निलांचल पर्वतावरील मंदिरेसुद्धा प्रकल्पात समाविष्ट !

देवीची मंदिरे : मातंगी, कमला, त्रिपुरासुंदरी, काली, तारा, भुवनेश्‍वरी, बगलामुखी, छिन्नमस्तिका, भैरवी, धुमावती देवी आणि दशमहाविद्या (देवीचे दहा अवतार)

शिवाची ५ मंदिरे : कामेश्‍वर, सिद्धेश्‍वर, केदारेश्‍वर, अमरटोकेश्‍वर, अघोरा आणि कौटिलिंग मंदिरे