‘हडपसर, पुणे येथील धर्मप्रेमी श्री. रवींद्र पुजारी ‘टाटा मोटर्स’ या आस्थापनाच्या पुणे येथील ‘सर्व्हिस सेंटर’मध्ये उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. ते कर्नाटक येथील श्री राघवेंद्र स्वामींच्या (मंत्रालयम्) मध्व संप्रदायानुसार साधना करत आहेत. काही मासांपूर्वी त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर समितीच्या कार्याची माहिती वाचली. त्यानंतर ते समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. आता ते नियमित ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गात सहभागी होतात, तसेच ते सेवांमध्ये सहभागी होतात. ओझर येथे २ ते ३.१२.२०२३ या कालावधीत झालेल्या द्वितीय मंदिर परिषदेनिमित्त ते सेवेत सहभागी झाले होते. तेथे त्यांना आलेली अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिली आहे.
१. नागीण झाल्याने मंदिर परिषदेसंबंधी सेवा करण्यात अडचण निर्माण होणे आणि शारीरिक त्रास होणे
‘श्री. महेंद्र अहिरे यांनी ‘ओझर येथे होणार्या मंदिर परिषदेसंबंधी सेवा कराल का ?’, असे विचारल्यावर मी त्यांना ‘हो’ म्हणालो. ‘धर्मकार्य करतांना अडचणी येतात’, असे मी ऐकले होते. मला परिषदेच्या १० दिवस आधी नागीण झाली. हा आजार वाढत जाणारा होता. त्यामुळे मी त्वरित आयुर्वेदाचे आणि ‘ॲलोपॅथी’चे उपचार चालू केले. आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘हा आजार वाढणारा आहे. त्यात तीव्र वेदना होतात. त्यामुळे तुम्हाला पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल.’’ त्या वेळी माझ्या मनात ‘काहीही झाले, तरीही ओझर येथे जाऊन मंदिर परिषदेसंबंधी सेवा करायची’, असा विचार अधिक होता. त्यासाठी मी आस्थापनातून आधीच २ दिवसांची सुटी घेण्याची अनुमती घेतली होती. ‘आता प्रकृतीच्या कारणासाठी ५ दिवस सुटी घेतली, तर ती सुटी रहित होईल’, असे मला वाटले. त्यामुळे मी कुणालाही न सांगता आस्थापनात जात राहिलो. मला २ रात्री पुष्कळ ताप होता. माझे अंग दुखत असे. मला कामाच्या ठिकाणी आसंदीवर ५ ते १० मिनिटे बसणेही कठीण होत होते.
२. ‘नामजपादी उपाय आणि गुरुदेवांच्या चरणी सतत आत्मनिवेदन’ असे केल्याने नागीण आजार पसरण्याचे थांबणे अन् सेवेत सहभागी होता येणे
मला परिषदेसंबंधी सेवा करायचीच होती. त्यामुळे मी केवळ श्री. महेंद्रदादांना मला होणारा त्रास सांगितला. त्यांनी माझी प्रेमाने विचारपूस करून मला विश्रांती घ्यायला सांगितली. त्यांनी मला ‘महाशून्य’ हा नामजप आणि गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सतत प्रार्थना करायला सांगितली. त्यांनी दिलेला नामजप मी सतत करत असे. मी गुरुदेवांच्या चरणी सतत आत्मनिवेदन केले. या सर्वांचा परिणाम म्हणून परिषदेच्या २ दिवस आधी माझा नागीण आजार पसरण्याचे थांबले. मला ५० ते ६० प्रतिशत पालट जाणवला. त्यानंतर मला परिषदेसंबंधी सेवेत सहभागी होता आले.
३. ‘परमेश्वर भक्तांचा योगक्षेम वहातो’, याची प्रचीती येणे
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २२
अर्थ : जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करत निष्काम भावनेने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणार्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.
गीतेतील या श्लोकानुसार भगवंताने दिलेल्या वचनाची अनुभूती मला घेता आली. ‘गुरुदेवांच्या कृपेनेच मला सेवेची संधी मिळाली आणि त्यांनी माझ्याकडून सेवा करूनही घेतली’, त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. रवींद्र पुजारी, हडपसर, पुणे. (१०.१२.२०२३)