जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार ! – अमोल येडगे, नूतन जिल्हाधिकारी, कोल्हापूर

श्री. अमोल येडगे

कोल्हापूर, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखहा, जोतिबा तीर्थक्षेत्र आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. याचसमवेत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या आराखड्याचेही काम चालू आहे. या सर्व प्रकल्पांचा आढावा घेऊन हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. यापूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून पदभार स्वीकारल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

१. तलाठी, मंडल अधिकारी, तसेच सर्व अधिकारी यांच्याकडून लोकाभिमुख काम होण्यासाठी, तसेच सर्व विभागांचा समन्वय चांगला राखून नागरिकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी माझे प्रयत्न रहातील.

२. स्पर्धा परीक्षाकाळात माझे शिक्षण मी कोल्हापूर येथे पूर्ण केले आहे. तेव्हाच मी कोल्हापूरच्या प्रेमात पडलो. कोल्हापूर हा महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा असून तो राज्यातच नाही, तर देशात ‘क्रमांक १’वर आणण्यासाठी माझे यापुढील प्रयत्न रहातील. शासनाच्या ज्या विशेष योजना आहेत, त्या लोकसहभागाच्या माध्यमातून जलदगतीने पुढे नेण्यासाठी माझे प्रयत्न रहातील.

३. श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंड, तसेच अन्य गोष्टींच्या संदर्भात ५ फेब्रुवारीला आढावा बैठक आयोजित केली आहे. त्यात सर्वच प्रलंबित गोष्टींचा आढावा घेऊन आवश्यक त्या कृती केल्या जातील.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील ! – जिल्हाधिकारी

अवैध मदरसा पाडल्यावर पूर्वीच्या जिल्हाधिकार्‍यांनी ‘मुसलमान समाजाने सर्व कागदोपत्री पूर्तता केल्यावर मदरसा बांधण्यास अनुमती दिली जाईल’, असे आश्वासन दिले आहे. तरी ‘हे आश्वासन नवीन जिल्हाधिकारी यांनी पाळावे’, अन्यथा बहुजन समाजाला समवेत घेऊन भव्य मोर्चा काढू’, अशी चेतावणी मुसलमान समाजातील काही नेत्यांनी दिली आहे. यावर ‘जिल्हाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय ?’ असा प्रश्न विचारल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी, ‘कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णयच मी घेईन. त्या संदर्भातील कागदपत्रे मला पहावी लागतील, नंतरच मी सांगू शकेन. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. कायद्याचे पूर्ण पालन केले जाईल’, असे सांगितले.