ग्रामस्थांचे उपोषण; पण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित
देवगड : तालुक्यातील आडबंदर, मुणगे येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, तसेच जलजीवन मिशन योजनेतून संमत झालेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी ३१ जानेवारीपासून चालू केलेले बेमुदत साखळी उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित केले; मात्र ‘३१ मार्च २०२४ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू’, अशी चेतावणी या वेळी ग्रामस्थांनी दिली.
आडबंदर विकास मंडळाचे प्रसिद्धीपत्रक –
मुणगे ग्रामपंचायतीकडून आडबंदर येथे होणारा पाणीपुरवठा गेले ७ मास बंद आहे, तसेच येथील जुनी जलवाहिनी खराब झाली आहे. जलजीवन मिशन योजनेतून मुणगे-आडबंदरसाठी संमत झालेले काम ८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी चालू करून २८ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पूर्ण करायचे होते; मात्र अद्यापपर्यंत कामच चालू झालेले नाही. ३ वर्षांपूर्वी मुणगे-आडबंदर नळयोजनेवर ९४ लाख रुपये खर्च झाले; पण पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. गावकर्यांनी मागणी करूनही या प्रकरणाची चौकशी झाली नाही. जलजीवन मिशनचे काम चालू करून ते पूर्ण कधी करणार ? याचे उत्तर मिळेपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार ३१ जानेवारी या दिवशी आंदोलन चालू करण्यात आले.
त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी महाजनी यांनी, ‘मुणगे नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार असून हे काम करत असतांना पाणीपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, तसेच मुणगे नळयोजना दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून चौकशीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावे’, असे लेखी पत्र ग्रामस्थांना दिले. (वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ? – संपादक)