अनधिकृत मदरशावर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करणार ! – सकल हिंदु समाज

तळवली (नवी मुंबई) येथील घटना !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – तळवलीमधील शासकीय भूमीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत मदरशाचे बांधकाम त्वरित न काढल्यास सकल हिंदु समाजाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे. याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे घणसोली विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, घणसोली अंतर्गत तळवली सेक्टर-२५ मधील भूखंड क्रमांक-७८ या शासकीय भूखंडावर मदरसा बांधला आहे. तेथे जिहादी प्रवृत्तीची शिकवण दिली जात आहे. ४-५ मासांपासून हे बांधकाम पाडण्याविषयी ऑनलाईन, तसेच ईमेल या माध्यमातून नवी मुंबई महापालिका आयुक्त, साहाय्यक आयुक्त आणि सिडको प्रशासन यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रार करण्यात आली; पण त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. या अवैध बांधकामाच्या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवण्याचीही मागणी करण्यात आली होती. ‘या संबंधित माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत अर्ज केला गेला असून माहिती पुरवण्याची मुदत संपूनही नवी मुंबई महापालिकेद्वारे या अर्जाची लेखी माहिती दिली नाही’, असा आरोप निवेदनात केला आहे. ‘८ दिवसांत या मदरशाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले नाही, तर संपूर्ण नवी मुंबईतील हिंदु समाज आणि हिंदु संघटना यांना समवेत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते तेजस पाटील यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याविषयी प्रशासनाला सांगावे का लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?