राज्यातील निवासी आधुनिक वैद्यांचा ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संप !

२८ वेळा पत्रव्यवहार करूनही कार्यवाही नाही

मुंबई – मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतीगृहांची स्थिती यांविषयी सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निवासी आधुनिक वैद्यांची केंद्रीय संघटना असलेल्या ‘मार्ड’ने ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांमधील निवासी आधुनिक वैद्य सहभागी होतील.

१. परराज्यातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामधील वसतीगृहांमध्ये जागा न्यून पडत आहे. यामुळे वसतीगृहांची संख्या वाढवण्याची मागणी मार्डकडून वारंवार करण्यात येत आहे. याविषयी सरकारकडून आश्वासन दिले जाते.

२. आधुनिक वैद्यांना विद्यावेतनही वेळेवर मिळत नाही. ते काही मास प्रलंबित असते.

या मागण्यांसाठी जानेवारी २०२३ मध्येही संप करण्यात आला होता; मात्र तेव्हा आश्वासन दिल्याने संप मागे घेतला. आता वर्ष उलटूनही याविषयी ठोस कार्यवाही झालेली नाही. आधुनिक वैद्यांनी महाविद्यालय प्रशासन आणि मंत्रालय येथे २८ वेळा पत्रव्यवहार केला; पण केवळ तोंडी आश्वासने दिली जातात. (महाविद्यालय प्रशासन आणि सरकार यांनी निवासी आधुनिक वैद्यांच्या संयमाची परीक्षा न पहाता त्यांना ठोस निर्णय तातडीने द्यावा ! – संपादक)