विटा-खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन !

सांगली – जिल्ह्यातील विटा-खानापूर मतदारसंघाचे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे ३१ जानेवारी या दिवशी निधन झाले. न्यूमोनियाच्या संसर्गामुळे त्यांना ३० जानेवारी या दिवशी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात २ मुले आहेत. सांगली जिल्ह्यात महत्त्वपूर्ण असलेल्या ‘टेंभू योजनेचे जनक’ म्हणून ते ओळखले जातात. आमदार बाबर सलग २० वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते.

गत २ निवडणुका त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवल्या होत्या. अनिल बाबर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा राजकीय प्रवास झाला आहे.