Rajasthan Hijab Ban : राजस्थानमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची सिद्धता !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले  वस्त्र)

कृषीमंत्री डॉ. किरोडीलाल मीणा

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्याची सिद्धता भाजप सरकारकडून करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी इतर राज्यांमध्ये हिजाब बंदीविषयीची माहिती अभ्यासासाठी मागवण्यात आली आहे. हिजाबबंदीचा विषय विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता. राज्यभरातील सरकारी शाळांमध्ये एकच गणवेश आहे, त्यात हिजाब नाही. मदरशांमध्ये शिकणार्‍या मुली हिजाब घालतात. काही अल्पसंख्यांक संस्थांकडून चालवण्यात येत असलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये स्वतंत्र गणवेश असतो. शीख विद्यार्थ्यांना पगडी घालून येण्याची अनुमती आहे.

१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिजाबबंदीच्या सूत्रावर शिक्षण विभागातील उच्च पातळीवर अहवाल सिद्ध करून शिक्षणमंत्री मदन दिलावर यांना पाठवण्यात येणार आहे.

२. इतर राज्यांतील हिजाबबंदीची स्थिती आणि राजस्थानमधील त्याचे परिणाम याविषयी  शिक्षणमंत्री दिलावर यांनी स्वत: विभागाकडून अहवाल मागवला असल्याचे सांगण्यात येत आहे.

३. उच्च स्तरावरून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राजस्थानच्या शाळांमध्येही हिजाबवर बंदी घातली जाऊ शकते.

शाळा, महाविद्यालये आणि मदरसे येथे गणवेश लागू करा ! – राज्याचे कृषीमंत्री डॉ. किरोडीलाल मीणा

कृषीमंत्री डॉ. किरोडीलाल मीणा यांनी राज्यभरातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची मागणी केली. ते म्हणाले की, शाळांमध्ये गणवेशाचा नियम पाळला पाहिजे. केवळ सरकारीच नव्हे, तर खासगी शाळा आणि मदरसे यांमध्येही हिजाबवर बंदी घातली पाहिजे. याविषयी मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. जेव्हा मोगल आक्रमक भारतात आले, तेव्हा त्यांनी हिजाबची परंपरा चालू केली. आपल्या देशात बुरखा आणि हिजाब कोणत्याही प्रकारे मान्य नाही. अनेक इस्लामी देशांमध्येही हिजाब आणि बुरखा यांना मान्यता नसतांना आपण ते का स्वीकारायचे ? आमच्या आमदाराने हे सूत्र उपस्थित केले आहे. पोलीस आणि विद्यार्थी यांनाही गणवेश आहे. गणवेशाचा नियम पाळला नाही, तर उद्या काही पोलीस अधिकारी कुर्ता आणि पायजमा घालून पोलीस ठाण्यात बसतील.

विधानसभेत काँग्रेसचे आमदार रफिक खान यांच्याकडून हिजाबचे सूत्र उपस्थित

काँग्रेस आमदार रफिक खान यांनी विधानसभेत सांगितले की, भाजपचे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी जयपूरच्या गंगापोळ येथील शाळेत हिजाबवर बंदी घातली आहे. त्यामुळे मुसलमान मुली हिजाब घालून येत नाहीत.

उद्या हिंदूंची मुलेही रंगीबेरंगी कपडे घालून येतील ! – आमदार बालमुकुंद आचार्य

भाजपचे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी हिजाबबंदीचा विषय प्रथम उचलून धरला. त्यांनी जयपूर येथील शाळेत जाऊन हिजाब घातलेल्या मुली पाहून संताप व्यक्त केला होता. याविषयी ते म्हणाले की, शाळांना गणवेश असतो. माझे भाषण पहाता येईल. मी शाळेतल्या मुलींना काहीच बोललो नाही. मी केवळ शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारले होते की, शाळेत २ प्रकारचे गणवेशाचे नियम आहेत का ? त्यावर ते ‘नाही’ असे म्हणाले. मी शाळेत २ प्रकारचे वातावरण पाहिले. एक हिजाबसह, दुसरा हिजाबविना. अशा परिस्थितीत उद्या हिंदूंची मुलेही रंगीबेरंगी कपडे घालून येतील.

संपादकीय भूमिका

युरोपमधील अनेक देशांमध्ये सावर्जनिक ठिकाणी हिजाब, बुरखा आदी इस्लामी कपडे घालण्यावर बंदी आहे. भारत सरकारनेही संपूर्ण देशात बुरखा आणि हिजाब यांवर बंदी घालावी, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !