भिलाई (छत्तीसगड) – गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद आणि अन्य समस्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्याचसमवेत प्रत्येक हिंदूने ‘स्वसंरक्षण कसे करावे ?’, हे शिकले पाहिजे. आपल्यावर उगारलेली काठी हिसकावून घेण्याचे धैर्य आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे आणि यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे. या आध्यात्मिक बळावरच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे, असे प्रतिपादन भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी केले. ते येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी उद्योजक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांसाठी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतांना बोलत होते. ‘आपण संघटना, जातीपाती, संप्रदाय यांमधला भेद विसरून हिंदु म्हणून संघटित झाल्यास आणि प्रयत्न केल्यास आपले ध्येय साध्य होईल’, असेही टी. राजा सिंह म्हणाले. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मदन मोहन उपाध्याय यांनी केले. या कार्यक्रमाला २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीशी सर्वांनी जोडून कार्य करावे ! – टी. राजा सिंह यांचे आवाहन
आमदार टी. राजा सिंह म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीचे कार्य छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, हे ऐकून मला आनंद झाला. आता सर्व संघटनांसाठी आपले स्वतःचे हक्काचे एक व्यासपीठ म्हणजे हिंदू जनजागृती समिती आहे. तुम्ही सर्वांनी समितीशी जोडून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
छत्तीसगड सरकारने हलाल उत्पादनावर बंदी घालावी ! – श्री. सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘हलाल हे देशविरोधी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधातले संकट कसे आहे ?’, याविषयी प्रबोधन केले. ‘उत्तरप्रदेश सरकारने ज्या पद्धतीने हलाल उत्पादनवर बंदी घातली त्याच पद्धतीने छत्तीसगड सरकारनेही या सर्व गोष्टींची चौकशी करून बंदी घातली पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी सर्व उपस्थित हिंदूंनी याचे समर्थन करून ‘हलाल मुक्त छत्तीसगड’चा संकल्प केला.