पुसेसावळी (सातारा) येथील दंगलीच्या प्रकरणी जनहित याचिका
सातारा – खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे एका धर्मांधाने हिंदु धर्मातील देवतांविषयी सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण केले होते. यानंतर गावात हिंदु-मुसलमान यांच्यात दंगल उसळली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. ‘कराड येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ विक्रम पावसकर यांनी मुसलमान धर्माविरुद्ध द्वेषभावना भडकावणारी वक्तव्ये आणि भाषणे केली होती. त्याचेच पडसाद उमटल्यामुळे ही दंगल घडली’, असे मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट जनहित याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ‘आरोपपत्रामध्ये विक्रम पावसकर यांचे नाव का नाही ? याविषयी सातारा आणि सांगली पोलिसांनी त्यांचे म्हणणे न्यायालयात सादर करावे’, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने सातारा आणि सांगली पोलिसांनी पावसकर यांच्यावर कारवाई न करण्याच्या कृतीविषयीसुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये शाकीर इस्माईल तांबोळी यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.