‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येथे वैराग्य धारण करण्याचा विचार केला होता’, या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या वक्तव्यावर अनेक चर्वितचर्वण चालू आहे. त्यामागील मला उमगलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका पुढीलप्रमाणे –
महाराजांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीला, असा विचार येणे स्वाभाविक आहे आणि योग्यही ! ‘हे राज्य श्रींचे’, असा त्यांचा भाव ! स्वतःचे राज्य त्यांनी गुरूंची आज्ञा मानून विश्वस्त म्हणून चालवले. अशा निःस्पृह श्रीमंत योगी (मनाने वैरागी) असलेल्या राजर्षींच्या मनात तेथील तत्कालीन निसर्ग, पवित्र वातावरण पाहून आणि असीम शांती अनुभवून असा विचार आला नाही तर आश्चर्य ! पातशाही, स्वराज्य, युद्ध हे सारे शेवटी मायेचा भाग, नाती, राजधर्म सारे सोडून त्या एकास शरण जाऊन तिथेच रहावे असे वाटणे, हे अत्यंत स्वाभाविक आहे.
आपल्यालाही स्मशानात सारे पाहून क्षणिक वैराग्य येतेच; पण ‘पुढे या पसार्यातही शिव आहे आणि त्या समष्टी रूपाची, म्हणजेच समाजपुरुषाची सेवा ही भगवंताची सेवा आहे’, ही जाणीव त्यांना त्यांच्या कुलदेवीच्या कृपेने झाली अन् ते पुन्हा कार्यप्रवण झाले. अर्जुनाला भर युद्धात शस्त्र टाकावे वाटले; कारण तेथेही वैराग्य होते; पण श्रीकृष्णाने जाणीव करून दिली की, ‘करणारा मी आहे, तुला निमित्त व्हायचे आहे.’ आता मध्येच सारे सोडले, तर ते वैराग्य म्हणून गौरवले जाणार नाही, तर ‘उपहास होईल, धर्मच्युत झाला’, असे होईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढेही पुरुषार्थ अवलंबला.’
– श्री. संजोग टिळक, पुणे. (२३.१.२०२४)