भाजीपाला व्यापार्यांची हानी आता कुणाकडून भरून काढणार ?
वाशी – मराठा आरक्षण मोर्चाचा वाशी येथील ए.पी.एम्.सी. बाजारामधील मुक्काम एक दिवस वाढल्याने मुंबई आणि उपनगरे यांना पुरवठा होणार्या भाजीपाल्यावर परिणाम झाला. शेतमालाच्या गाड्यांची आवक १५ ते २० टक्के अल्प झाली, तर १० टक्के माल खराब झाल्याने ए.पी.एम्.सी.तील व्यापार्यांसह शेतकर्यांना फटका बसला. मराठा आरक्षणासमवेतच सरकारने शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांचाही विचार करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया व्यापार्यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे यांनी राज्यशासनाकडून अध्यादेश मिळेपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यावर आझाद मैदानाच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर असलेल्या सर्व गाड्या सायंकाळी उभ्या करण्यासाठी ए.पी.एम्.सी. बाजारामध्ये आल्या. त्यामुळे २७ जानेवारीलाही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. मुंबईकरांना भाजीपाल्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी शेतमालाच्या गाड्या थेट मुंबईत सोडण्याचे परिपत्रक काढावे लागले. शेतमालाच्या अनुमाने ४५० गाड्या सायंकाळपासून भाजीपाला बाजाराच्या बाहेर आल्या. त्यामुळे व्यापार्यांनी या गाड्या मुंबईमध्ये थेट पाठवण्याऐवजी बाजाराबाहेर व्यापार केला, अशी माहिती भाजीपाला बाजारपेठेचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.
परिणामी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारपेठा आणि बाहेरील रस्ते येथे सर्वत्र याच गाड्या उभ्या होत्या. रात्री १० वाजल्यापासून भाजीपाला व्यापार्यांनी येथे त्यांचा व्यापार चालू केला होता. तो दुसर्या दिवशी सायंकाळपर्यंत चालू होता. त्यामुळे ए.पी.एम्.सी. भाजीपाला बाजार आणि फळबाजार परिसरामध्ये प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. रात्री विलंबाने आलेल्या शेतमालाच्या गाड्या दुपारनंतरही उघडल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे लाखो रुपयांचा शेतमाल खराब झाल्याने तो फेकून द्यावा लागला. शेतकरी आणि व्यापारी यांची हानी झाली. फळ, कांदा-बटाटा आणि भाजीपाला या तीनही शेतमालांच्या गाड्या दुपारनंतर आतमध्ये घेण्यास आरंभ करण्यात आला. व्यापार्यांनी शिल्लक मालाची विक्री केली.