पुणे – १६ वर्षांखालील मुलांसाठी खासगी शिकवण्या नकोत, हा नियम अन्यायकारक असल्याचे सांगत खासगी शिकवणी चालकांनी सरकारच्या नियमावलीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील खासगी शिकवणी चालकांची २८ जानेवारी या दिवशी नाशिक येथे बैठक होणार आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची सिद्धता खासगी शिकवणी चालकांनी केली आहे. ‘१६ वर्षांखालील मुलांना शिकवणी नको’ हा निर्णय अन्यायकारक आहे. ‘असर’ या संस्थेने सादर केलेल्या अहवालाअन्वये आठवीच्या मुलांना तिसरी, चौथीचे धडे वाचता येत नाहीत. त्यामुळे सरकारने ‘शिकवणीवर्ग नको म्हणणे’, हा विरोधाभास असून त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांची हानी होणार आहे, तसेच शासनाच्या या निर्णयामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे, असे मत राज्यशासनाने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य बंडोपंत भुयार यांनी व्यक्त केले. खासगी शिकवणी ही औपचारिक शिक्षणाला पूरक असलेली व्यवस्था आहे; मात्र ही व्यवस्था बंद झाल्यास विद्यार्थी कोठे जाणार ? हा प्रश्न आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदी जाचक असून त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे मत खासगी शिकवणी चालक दुर्गेश मंगेशकर यांनी व्यक्त केले.
नवीन नियमावली अन्वये १६ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच शिकवणीवर्गाला प्रवेश देता येणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेला उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्त करता येईल, तर पुढील ३ मासांत नव्याने चालू होणार्या शिकवणीवर्गांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.