पंचांची प्रत्यक्ष साक्ष आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांतील अनेक तफावती अधिवक्ता अनिल रुईकर यांच्याकडून उघड !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कॉ. गोविंद पानसरे

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित वासुदेव सूर्यवंशी यांच्या संदर्भातील एक घटनेची साक्ष पंच देवीदास सूर्यवंशी यांनी २४ जानेवारीला दिली. ही साक्ष देतांना त्या घटनेच्या वेळी प्रत्यक्ष पंचनाम्यात नमूद करणार्‍या आलेल्या गोष्टी आणि पंचांनी न्यायालयात नमूद करण्यात आलेल्या गोष्टी यांत अनेक तफावती असल्याचे अधिवक्ता अनिल रुईकर यांनी न्यायालयात उघड केल्या. संपूर्ण पंचनाम्यात संशयित वासुदेव सूर्यवंशी यांनी माहिती दिल्याचे नमूद नाही, पोलिसांसमवेत घटनास्थळी जातांना खासगी गाडीतून प्रवास केला; मात्र तसे नमूद केले नाही, पंचनाम्यासाठी किती किलोमीटर प्रवास केला ? आणि किती वेळ लागला ?, याविषयी पंचनाम्यात नमूद केले नसल्याचे अधिवक्ता अनिल रुईकर यांनी उलटतपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. सरकारपक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. अधिवक्ता डी.एम्. लटके, अधिवक्ता समीर पटवर्धन यांनीही पंचांची उलटतपासणी घेतली. या प्रसंगी अधिवक्ता आदित्य मुद्गल, अधिवक्ता सारंग जोशी उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारी या दिवशी होणार आहे. संशयित वासुदेव सूर्यवंशी याने जळगावजवळ एके ठिकाणी बंदुकीतून गोळी चालवण्याचा सराव केला होता. त्या घटनास्थळाचा पंचनामा देवीदास सूर्यवंशी यांनी केला होता, असे सरकारपक्षाचे म्हणणे असून त्यांची साक्ष २४ जानेवारीला नोंदवण्यात आली.

या प्रसंगी अधिवक्ता अनिल रुईकर उलटतपासणीत म्हणाले, ‘‘घटनेच्या ठिकाणी जातांना संशयित रस्ता दाखवत होता, हे वाक्य पंचनाम्यात नमूद नाही. वाहनाचा प्रकार, ‘स्पीडोमीटरचे रिडींग’ यांच्या संदर्भात पंचनाम्यात काहीही नमूद नाही. संशयिताच्या घरी गेल्यावर ते घर पूर्वीपासून बंद होते का ? उघडे होते ? याचा उल्लेख नाही, तसेच घराच्या झडतीत किती वेळ लागला ? हेही नमूद नाही.’’ घटनास्थळी जातांना खासगी गाडी का आणली ? त्याऐवजी सरकारी गाडी का आणली नाही ? ही गाडी कुणाच्या मालकीची आहे ?, गाडीच्या चालकाचे नाव ? याची कोणतीही माहिती पंचांनी विचारली नाही, हे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी  न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.