आरोग्य विभागाचा निर्णय !
मुंबई – राज्याच्या ग्रामीण भागात मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत, तसेच स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पुरेशा शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे हाल होतात. त्यामुळे आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील २५ महापालिका क्षेत्रांत काही प्रमाणात मृतदेह वाहून नेण्यासाठी व्यवस्था आहे; मात्र तालुकास्तरावर, तसेच आदिवासी भागात लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर वरील निर्णय घेतला. यानुसार एकूण ३५२ शववाहिन्या खरेदी करण्यात येणार असून यासाठी आगामी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात प्रती शववाहिनी ३५ लाख रुपये याप्रमाणे १२३ कोटी २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.