छत्रपती संभाजीनगर येथील गर्भवतींकडून २२ जानेवारीला प्रसूती करण्याची इच्छा व्यक्त !

२०० गर्भवतींना ३९ आठवडे पूर्ण होत असल्याने त्यांच्या प्रसूतीची शक्यता

छत्रपती संभाजीनगर – शहरातील ६०० गर्भवतींनी अयोध्येत श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर म्हणजे २२ जानेवारी या दिवशी प्रसूती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहरातील दांपत्यांना त्यांच्या बाळाचा जन्म याच ऐतिहासिक शुभ मुहूर्तावर व्हावा, अशी इच्छा आहे. ९ मास पूर्ण झाल्यानंतर २५ जानेवारी या दिवशी महिलांचे ‘सिझेरियन’ (शस्त्रकर्म) निश्चित केले होते; मात्र २२ जानेवारी या दिवशी आपल्या बाळाचा जन्म व्हावा, यासाठी दांपत्यांनी मासाभरापूर्वी आधुनिक वैद्यांना विनंती केली आहे. ‘आपण रामाचे भक्त असल्याने या दिवशी याच मुहूर्तावर बाळाला जन्म देणे हा आपल्यासाठी सर्वांत मोठा आनंदाचा क्षण आहे’, अशी अनेक दांपत्यांची भावना आहे.

६०० पैकी केवळ २०० गर्भवती मातांना ३९ आठवडे पूर्ण होत असल्याने त्यांची प्रसूती होण्याची शक्यता आहे. मुदतपूर्व ‘सिझेरियन’ केल्यास बाळाच्या कोवळ्या फुप्फुसांना श्वसनास त्रास होतो. बाळाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवावे लागण्याची, तसेच कावीळही होण्याची शक्यता असते.

२२ जानेवारीला जन्मलेल्या बाळाचे योग काय ?

सूर्य उगमस्थानापासून दुपारी ४.२३ वाजेपर्यंत जन्मलेल्या बाळाची रास वृषभ असेल. दुपारी ४.२३ नंतर जन्मलेल्या बाळाची रास मिथुन असेल.

नक्षत्र : मृगसूर्य उगवल्यापासून ८.४६ पर्यंत ब्रह्मयोग, तर ८.४६ नंतर जन्मलेल्या बाळाचा ऐंद्रयोग.

‘रामललाची प्राणप्रतिष्ठा होत असतांना जन्मलेल्या बाळाचे मेष लग्न असून भाग्यात मंगळ, बुध, गुरु, दशमस्थानात रवी आहे. हे बालक तेजस्वी, उत्तम आणि लोकप्रिय असेल.’ – अनंत पांडव, गुरुजी.