जालना येथून मुंबईच्या दिशेने आंदोलनकर्ते मनोज जरांगे रवाना !

आंदोलनकर्ते मनोज जरांगे

जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील २० जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या वेळी त्यांच्यासमवेत मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली होती. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी असेन किंवा नसेन; पण मराठ्यांमध्ये फूट पडू द्यायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही. मराठ्यांची मुले संपवण्याचा घाट घातला जात आहे. मराठ्यांची मुले आत्महत्या करत आहेत. तरीही सरकार हा विषय गांभीर्याने घेत नाही. आरक्षण मिळण्यासाठी शासनाच्या दारात मरण आले, तरी आता माघार नाही. आरक्षण घेऊनच परत येणार आहे. उपोषणामुळे शरीर साथ देत नाही; पण लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे. या वेळी जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू येऊन ते भावूक झाले.

मनोज जरांगे म्हणाले की, आता छातीवर गोळ्या लागल्या, तरी माघार नाही. समाजासाठी मी बलीदान देण्यास सिद्ध आहे. त्या संदर्भात समाजाला विचारून निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे. समाजाला विचारून मी आजच हा निर्णय घोषित करणार आहे. आता समाजासाठी जीव अर्पण करायचा आहे. मराठ्यांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. ही आरक्षणासाठी शेवटची लढाई आहे.